बेदी यांना भाजपबद्दल सॉफ्टकॉर्नर: केजरीवाल

नवी दिल्ली: टीम अण्णाच्या ज्येष्ठ सदस्य किरण बेदी यांना भारतीय जनता पक्षाबद्दल सॉफ्टकॉर्नर असल्याची टीका टीमचे दुसरे ज्येष्ठ सदस्य अरविंद केजरीवाल यांनी पत्रकारांशी बोलताना केली. मात्र त्यांना पुन्हा विश्वासात घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचा खुलासाही केजरीवाल यांनी केला.

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांनी हातमिळवणी करून कोळसा खाण घोटाळा घडवून आणल्याचा आरोप करून केजरीवाल यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे रविवारी सकाळी त्यांनी पंतप्रधानांचे निवासस्थान गाठले. मात्र पोलिसांनी त्यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडून दिले. या आंदोलनात बेदी यांच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न केला असता केजरीवाल यांनी स्पष्टपणे बेदी यांना भारतीय जनता पक्षाबद्दल सॉफ्टकॉर्नर असल्याचे विधान केले.

गडकरी यांच्या निवासस्थानाला घेराव कशासाठी असा सवाल करून; विरोधी पक्षांनाही लक्ष्य केल्यास आंदोलनाची ताकद कमी होईल. त्यामुळे सध्या फक्त सत्ताधारी पक्षांना लक्ष्य करावे; असे मत बेदी यांनी शनिवारी ट्विटरवर व्यक्त केले होते.