राज ठाकरे कूपमंडूक वृत्तीचे: अबू आझमी

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कूपमंडूक वृत्तीचे असून त्यांच्या दृष्टीने भारत हा हिंदुस्थान आहे; अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली. भिवंडीतील माझ्या मतदारात किमान १ लाख मतदार बांगलादेशी किंवा पाकिस्तानी असल्याचे ठाकरे यांनी शोधून दाखविल्यास मी त्यांना दोन कोटी रुपये देईन; असे आव्हानही त्यांनी दिले.

रझा अकादमीच्या मोर्चाच्या वेळी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे उसळलेल्या हिंसाचाराच्या विरोधात मनसेने आयोजित केलेल्या मोर्चानंतर सभेत बोलताना ठाकरे यांनी आझमी घुसखोरांच्या मतांवर निवडून येत असल्याची टीका केली होती.

राज ठाकरे यांची महाराष्ट्र धर्माची भाषा बेगडी असून ते लोकांना मूर्ख बनवित आहेत; असा प्रतिहल्ला आझमी यांनी चढविला.

छत्रपती शिवाजी टर्मिनस वरील हिंसाचार मुस्लिमांनी नव्हे तर ड्रग्ज माफियांनी घडवून आणल्याचा दावा करून आझमी यांनी ठाकरे हे मुंबईत आणि राज्यात पसरणार्‍या नायजेरियन ड्रग्ज माफियांच्या विरोधात आवाज का उठवित नाहीत; असा सवालही केला.

Leave a Comment