हरभजनला गवसला फॉर्म

गेल्या काही दिवसापासून फिरकी गोलंदाज हरभजन सिंगचा फॉर्म हरवल्यामुळे चांगलाच अडचणीत सापडला होता. त्याचा फॉर्म भारतीय संघासाठी सुद्धा चिंतेचा विषय झाला होता. मात्र नुकत्याच झालेल्या कौंटी क्रिकेटमध्ये हरभजनला हरवलेला फॉर्म पुन्हा गवसला आहे. त्याने एका सामन्यात त्याच्या जादूई फिरकीने प्रतिस्पर्ध्यांचा निम्मा संघ गारद केला.

हरभजनला फॉर्म गवसल्याने त्याचा जिगरी दोस्त युवराज सिंग सध्या खूप खूष आहे. या मालिकेतील हरभजनच्या कामगिरीचा लेख जोखा युवराज सध्या ट्विटरवरून सर्वाना सांगत आहे. सध्या इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत नशीब अजमावत असलेल्या हरभजनने असेक्सकडून खेळताना नेदरलँडचा अर्धा संघ केवळ ३७ धावात बाद केला.

यापूर्वी इंग्लंड दौऱ्यात जखमी झाल्याने हरभजनला भारतीय संघातून स्थान गमवावे लागले होते. त्यानंतर फिटनेसच्या कारणावरून संघात निवड झाली नव्हती. गेल्या वर्षभराच्या कालावधीत फॉर्म अभावी हरभजनला संघाबाहेर बसावे लागले होते. त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला नवख्या प्रग्यान ओझा, आर. आश्विन, अमित मिश्रा यांचा मुकाबला करावा लागत होता.

त्यामुळेच हरभजनने कौंटीमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्याने सुरुवातीच्या ८ सामन्यात २३ बळी घेतले. त्यानंतरच्या ४ सामन्यात २३ बळी घेतले आहेत. त्यामुळे सध्या तो खूष आहे. यापूर्वी २००७ मध्ये जलदगती गोलंदाज झहीर खाननेही फॉर्म गवसण्यासाठी कौंटी क्रिकेटचा आधार घेतला होता.

Leave a Comment