अ‍ॅपलचा नवा उच्चांक

न्यूयॉर्क: मायक्रोसॉफ्ट कंपनीचा विक्रम मोडीत काढून अ‍ॅपल या सॉफ्टवेअर कंपनीने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. कंपनीचे भांडवली मूल्य ६२३.१४ अरब डॉलर एवढे झाले असून अ‍ॅपलने सन १९९९ मध्ये मायक्रोसॉफ्टने केलेला ६२०. ५८ अरब डॉलर बाजार मूल्याचा उच्चांक मोडीत काढला आहे.

आयफोन, आयपॅड या सारखी लोकप्रिय तांत्रिक उपकरणे बनविण्यार्‍या अ‍ॅपलने मागील वर्षी एक्सॉनमोबिल या पेट्रोलियम क्षेत्रातील कंपनीला मागे टाकून जगातील सर्वात मोठी पब्लिक लिमिटेड कंपनी होण्याचा मान पटकाविला आहे. अमेरिकन स्टॉक एक्स्चेंजमध्ये अ‍ॅपलच्या समभागात २ टक्क्यांनी वाढ होऊन तो ६६१.१५ डॉलरपर्यंत पोहोचला आहे.कंपनीच्या आयफोन-५ आणि आयपॅड मिनी या सप्टेंबर महिन्यात बाजारात येणार्‍या उत्पादनांना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याच्या अपेक्षेने कंपनीचे समभाग वधारले आहेत. कंपनीने अ‍ॅपल दूर चित्रवाणी संच बाजारात आणण्याची घोषणा केली असून या उत्पादनालाही मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.