लंडन: अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला ठार मारण्याची मोहीम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तीन वेळा थांबविली होती. मात्र परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्या आग्रहामुळे लादेनचा खात्मा करण्यात आला; असा दावा ‘लीडिंग फ्रॉम बिहाईण्ड’ या पुस्तकात करण्यात आला आहे.
लादेनवरील कारवाई ओबामांनी लांबविली: रिच मिंटर
वॉल स्ट्रीट जर्नल आणि वॉशिंग्टन टाईम्स या आघाडीच्या दैनिकात काम करणार्या रिच मिंटर यांनी हे पुस्तक लिहिले असून सन २०११ च्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ओबामा यांनी लादेनला ठार करण्याची मोहीम थांबविली; अखेर मे महिन्यात लादेनचा खात्मा करण्यात आला. अशी माहिती या पुस्तकात दिली आहे. अबोटाबाद येथे खरोखरच लादेनचे वास्तव्य असल्याबद्दल ओबामांच्या मनात शंका होती आणि ही कारवाई फसल्यास आपल्याला मोठ्या प्रमाणात टीका झेलावी लागेल; अशी भीती ओबामा यांना होती.
लादेनला मारण्याचे नियोजन करण्याच्या कामापासून अध्यक्ष अलिप्तच होते. सीआयएचे तत्कालीन संचालक लिओन पेनेटा, संरक्षण मंत्री रॉबर्ट गेट्स आणि परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्यावरच ओबामा यांनी या मोहिमेची जबाबदारी सोपविली होती; असे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.
