मनसेचा मोर्चा आझाद मैदानावर

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला गिरगाव चौपाटीपासून मंगळवारी दुपारी सुरुवात झाली आणि आझाद मैदान येथे मोर्चाचे रुपांतर भव्य सभेत झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभेच्या ठिकाणी दाखल झाले असून ते राज्यसरकारचे ठाकरी शैलीत कसे वाभाडे काढणार याची उत्सुकता आहे.

रझा अकादमीच्या मोर्चामध्ये उसळलेला हिंसाचार, पोलीस व पत्रकारांवरील हल्ले याचा निषेध करण्यासाठी मनसेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. दंगेखोरांवर कारवाई करण्यास असमर्थ ठरलेले गृहमंत्री आर.आर. पाटील आणि पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांनी राजीनामा द्यावा अशी मनसेची मागणी आहे.

पोलिसांनी परवानगी नाकारूनही मनसेचा मोर्चा निघणारच; असा निर्धार ठाकरे यांनी सोमवारी व्यक्त केला होता. या मोर्चासाठी राज्यभरातून लाखो मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने मोर्चात सहभागी झाले आहेत. दुपारी सिद्धी विनायकाचे दर्शन घेऊन राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय मोर्चात दाखल झाले.

Leave a Comment