महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस नको: राज ठाकरे

मुंबई: महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची ताकद होणार नाही; याबाबत मराठी माणसाने दक्ष असावे; असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

रझा अकादमीच्या मोर्चानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाचा समारोप राज ठाकरे यांच्या सभेने झाला. गृहमंत्री आर. आर. पाटील आणि पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांनी राजेनामा द्यावा या मागणीचा ठाकरे यांनी पुनरुच्चार केला.

पकडलेल्या गुन्हेगारांना पोलीस आयुक्त सोडून द्यायला सांगतात. त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होते. मराठी पोलीस दंगेखोरांकडून मार खातात. मराठी पोलीस भगिनीण्चा विनयभंग केला जातो. याची लाज बाळगून पाटील आणि पटनायक यांनी राजीनामा द्यावा; अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हिंसाचार मुंबईतील लोकांनी नव्हे तर बांग्ला देशातून आलेल्या घुसखोरांसह बिहार, उत्तरप्रदेशमधून आलेल्या उपर्‍यांनी घडविल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला.

काही दिवसापूर्वी भिवंडीत मोर्चापुढे अबू आझमी यांनी भडकावू भाषण दिले आणि त्याही वेळी पोलिसांना मार खावा लागला. तरीही त्यांना मोर्चा काढायला परवानगी आणि आम्ही हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढत असताना आम्हाला परवानगी नाही; अशी टीका करून ठाकरे यांनी हे मोगलाई आहे काय; असा संतप्त सवाल केला.

मनसे सरसकट सगळ्या मुस्लिमांच्या विरोधात नाही. राष्ट्रद्रोही शक्तींना आपला विरोध आहे; असे सांगतनाच ठकरे यांनी हिंदुत्वाचे कार्ड वापरण्यात आपल्याला रस नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान या सभेच्या वेळी प्रमोद तावडे या पोलीस शिपायाने ठाकरे यांनी पोलिसांची बाजू घेतल्याबद्दल फूल देऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर त्याने प्रसिद्धी माध्यमांकडेही आपली बाजू मांडली. तावडे याला आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मनसेला सभेसाठी परवानगी देण्यात आली. मोर्चासाठी नाही. त्यामुळे बेकायदा मोर्चा काढल्याबद्दल संबंधितांवर कारवाई होणार असल्याचे संकेत पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी दिले.

Leave a Comment