नवी दिल्ली: देशातील लोकसभा आणि राज्यातील विधानसभा यांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्यासाठी राष्ट्रपतींनी पुढाकार घ्यावा; अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली आहे. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्यास सरकारांच्या निर्णयक्षमतेत वाढ होईल; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
विद्यमान राष्ट्रपती संसदेत कार्यरत असताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांनी याबाबत सकारात्मक मत व्यक्त केले होते; असे अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगवर नमूद केले आहे. लोकसभा आणि विधानसभांचा कार्यकाळ भिन्न असेल तर निर्णय प्रक्रियेत अडथळे येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
विद्यमान केंद्र सरकारमध्ये मुखर्जी यांनी दीर्घकाळ काम केले आहे. त्यामुळे त्यांनी दर पाच वर्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याबरोबरच निवडणुकीत पैशाचा गैरवापर टाळणे आणि निवडणूक प्रक्रिया सुधारणे यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन अडवाणी यांनी केले आहे.