मुंबई हिंसाचाराबाबत रझा अकादमीने मागितली माफी

मुंबई: शनिवारी छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील थैमानाबाबत रझा अकादमीने प्रसार माध्यमे, पोलीस आणि मुंबईकरांची जाहीर माफी मागितली. आमच्या मोर्चाचा गैरफायदा घेऊन काही समाजविघातक शक्तींनी हिंसाचार घडविला असल्याचा दावाही अकादमीच्या वतीने करण्यात आला.

रमझानच्या पवित्र महिन्यात अशा प्रकारे हिंसा करणारा कोणीही सच्चा मुसलमान असू शकत नाही; असे अकादमीचे अध्यक्ष महंमद सईद नुरी यांनी सांगितले.

मुस्लिमांची प्रागतिक विचारांची संघटना समजल्या जाणार्‍या अकादमीच्या प्रतिमेला या हिंसाचारामुळे मोठा धक्का बसला आहे.

या मोर्चाला मिळालेला प्रतिसाद अनपेक्षित होता. मोर्चात साधारणपणे दोन हजार जण सहभागी होतील असा आमचा अंदाज होता. आझाद मैदानावरील सभेसाठी आम्ही केवळ दीड हजार खुर्च्यांची व्यवस्था केली होती; असे सांगून मोर्चाचे एक संयोजक अहमद रझा यांनी मोर्चाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

या प्रकरणातील दोषींचा शोध घेऊन शासन आणि पोलिसांनी त्यांना कठोर शासन करावे; असे आवाहनही अकदमीने केले आहे.

Leave a Comment