लष्करे तैयबाची भारतावर हवाई हल्ल्याची तयारी

मुंबई दि.११ – पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्करे तैयबाने भारतातील शहरांवर हवाई हल्ले करण्याची योजना आखली असून या हल्लांसाठी १५० पाराग्लाईडरना प्रशिक्षित केले आहे अशी खळबळजनक माहिती मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अबू जुन्दालने दिली आहे. मुंबई हल्ल्याच्या वेळी हाच जुन्दाल कराचीतून या हल्ल्याचे नियंत्रण करत होता. त्याने पाकव्याप्‍त काश्मीरमध्ये मुझफ्फराबाद येथे १५० सील केलेले पाराशूट बॉक्स स्वतः पाहिले असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

जुन्दालची जबानी न्यायाधीशांसमोर नोंदविण्यात आली असल्याने तिचा पुरावा म्हणूनही वापर करता येणार आहे. यावेळी जुन्दालने त्याचे खरे नाव जबिउद्दिन अन्सारीच असल्याचे व तो महाराष्ट्रातील बीड येथील असल्याचेही पोलिसांना सांगितले आहे.

२००६ सालीच दहशतवादी संघटनाशी संबंध असल्याच्या संशयावरून जुन्दाल पोलिसांना हवा होता.मात्र तेव्हा तो प्रथम बांग्लादेशात व नंतर पाकिस्तानात गेला. थेथून तो पाकिस्तानी पासपोर्टवर सौदीला गेला होता. अमेरिकी गुप्तवार्ता विभागाने त्याची माहिती भारताला कळविली होती व नंतर या दोन्ही देशांच्या प्रयत्नातून सौदीने त्याला भारताच्या स्वाधीन केले होते.

Leave a Comment