‘टी-२० वर्ल्डकपसाठी युवराज फिट

मुंबई, १० ऑगस्ट-भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग टी टवेण्टी वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. युवराज सिंग वर्ल्डकपसाठी फिट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे उद्या होणार्‍या निवड समितीच्या बैठकीत त्याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. फास्टर बॉलर ईशांत शर्माही फिट असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आणि टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची शुक्रवारी मुंबईत निवड होणार आहे. तब्बल सात महिन्यांनी टीम इंडिया कसोटीच्या मैदानात उतरणार आहे.

दोन सामन्यांच्या या मालिकेसाठी कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे कॅन्सरसारख्या दुर्धर रोगावर मात करत युवराज मैदानात उतरला आहे. श्रीलंकेत होणार्‍या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तो कसून सराव करत असल्याने ,त्याचा समावेश होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटपासून दूर आहे. या विश्रांतीनंतर सचिन न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून कमबॅक करू शकतो. त्याशिवाय राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर रिकामी झालेली जागा कोणाला मिळणार, व्हीव्हीएस लक्ष्मणला आणखी एक संधी मिळणार का, याविषयीही उत्सुकता कायम आहे. त्याशिवाय चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि सुरेश रैनाही शर्यतीत आहेत.

गोलंदाजीत झहीर खान, इरफान पठाण, विनय कुमार, प्रवीण कुमार, प्रग्यान ओझा, आर अश्विन यांचे पर्याय निवड समितीपुढे असतील.

Leave a Comment