चित्रपट सृष्टीच्या शताब्दीनिमित्त मराठी चित्रपट महामंडळातर्फे आयोजन

पुणे, दि. १० – भारतीय चित्रपट सृष्टीच्या शताब्दीनिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने उत्कृष्ट शंभर मराठी चित्रपटांच्या महोत्सवाचे आयोजन करण्याची घोषणा केली होती. मात्र, महामंडळातर्फे देण्यात आलेल्या चित्रपटांच्या यादीत उत्कृष्ट चित्रपटांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत आहे. हा उत्कृष्ट चित्रपटांचा महोत्सव की, ज्या खासगी वाहिनीशी महामंडळाने सहकार्य करार केला आहे, त्या वाहिनीकडे उपलब्ध असलेल्या चित्रपटांचा महोत्सव? असा प्रश्न रसिकांना पडला आहे.

भारतीय चित्रपटाच्या शताब्दीचे औचित्य साधून चित्रपट महामंडळाने चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा महोत्सव शहरातील सहा चित्रपटगृहांत शनिवारपासून सुरू होत आहे. या महोत्सवात दाखवण्यात येणारे शंभर चित्रपट कोणत्या निकषांवर निवडणार, असा प्रश्न उपस्थित केला असता महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी राष्ट्रीय, राज्य, आंतर राष्ट्रीय, तसेच अन्य पुरस्कारप्राप्त चित्रपटांसह काही व्यावसायिक यशस्वी चित्रपटचांही समावेश करण्यात येईल, असे म्हटले होते. प्रत्यक्षात चित्रपटांची जी यादी महामंडळातर्फे देण्यात आली, त्यामध्ये संबंधित वाहिनीकडे जे चित्रपट आहेत, त्यांचाच भरणा दिसत आहे. त्यामुळे या खासगी वाहिनीकडे जे चित्रपट उपलब्ध आहेत, तेच मराठीतील आजवरचे उत्कृष्ट चित्रपट आहेत, असे मानण्याची वेळ रसिकांवर आली आहे.

या चित्रपट महोत्सवात `जगाच्या पाठीवर’, `लाखाची गोष्ट’, `पाठलाग’, `उंबरठा’, `सिंहासन’, `जैत रे जैत’, `अवघाची संसार’, अशा काही मोजक्या जुन्या चित्रपटांचा समावेश असल्याचे यादीवरून दिसते.

चित्रपटांची यादी हाती आल्यानंतर सुर्वे यांना या विषयी विचारले असता ते म्हणाले, आम्ही उत्कृट चित्रपटांचाच महोत्सव आयोजित केला आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील काही चित्रपट मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यासाठी असलेली प्रोसेस करण्याइतपत वेळ आमच्याकडे नव्हता. त्या वाहिनीकडे असलेले चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येतील.  

चित्रभूषण पुरस्काराचे वितरण शनिवारी 
महामंडळाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दि. ११ ला होणार आहे.

यावेळी `मानाचा मुजरा’ या विशेष रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे.

अभिनेते सचिन पिळगांवकर व ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांना चित्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ मराठी चित्रपट सृष्टीत कार्यरत असणार्या कलाकार व तंत्रज्ञांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.