पुणे दि.८ – पुण्यात १ ऑगस्टला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा तपास करणार्या पुणे गुन्हा अन्वेषण विभाग आणि दहशतवाद विरोधी पथक यांच्यात विसंवादाचे सूर उमटू लागले आहेत. गुन्हा अन्वेषण विभागाच्या तपास अधिकार्यांना दहशतवाद विरोधी पथकातील कांही अधिकारी तपासकामाच्या प्रगतीची माहिती अजिबात देत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. त्यामुळे आपली मानहानी होत असल्याची भावना गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकार्यांच्या मनात निर्माण झाली आहे असे समजते.
सीआयडी आणि एटीएस पथकात विसंवादाचे सूर
पुण्यात स्फोट झाल्यानंतर तपासअधिकारी म्हणून गुन्हा अन्वेषण विभागाचे उपायुक्त विनोद सातव यांची नेमणूक करण्यात आली आहे. सातव यांनीही पूर्वी दहशतवाद विरोधी पथकात उपायुक्त म्हणून कामगिरी बजावलेली असून तेव्हा पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटाचा तपास त्यांच्याचकडे सोपविलेला होता. तो अनुभव लक्षात घेऊन या स्फोटांच्या तपासाचे कामही त्यांना देण्यात आले. गुन्हा अन्वेषण विभागाने सहा तपास पथके नियुक्त केली असून या पथकांकडे विविध प्रकारच्या जबाबदार्या सोपविण्यात आल्या आहेत. जंगली महाराज, डेक्कन परिसरातील सीसीटिव्ही फूटेज गोळा करणे .नाकाबंदी करून येणार्या जाणार्यांची चौकशी करणे, बंदी असलेल्या संघटनांची आणि त्यांच्या सदस्यांसंबंधीची माहिती गोळा करणे अशी ही कामे असून त्याचा दररोजचा अहवाल दहशतवाद पथकाकडे सोपविला जात आहे. मात्र फूटेज ताब्यात घेतल्यानंतर या विभागाने या तपास अधिकार्यांना ते पाहू दिलेले नाही तसेच तपासकामात काय प्रगती झाली याची माहितीही त्यांना देण्यात येत नाही असे समजते.
जर्मन बेकरी स्फोट तपास प्रकरणातही गुन्हा अन्वेषण विभागाला दहशतवाद विरोधी पथकांकडून अशीच वागणूक दिली गेली होती त्यामुळे गुन्हा अन्वेषण विभागातील अधिकारी नाराज आहेत असे सांगण्यात येत आहे.
