कराची, दि ९ – संपूर्ण जगातील खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी प्रयत्नशील असतात कारण आयपीएल स्पर्धा म्हणजे पैशांची लयलूट असते. म्हणूनच जेव्हा पाकिस्तानी खेळाडूना आयपीएलला बंदी घातली तेव्हा त्यांचा चांगलाच हिरमोड झाला. पण आयपीएलसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंचे प्रेम अद्यापीही ऊतू जात आहे.
शाहीद आफ्रिदीला येतीय आयपीएलची आठवण
याचे उत्तम उदाहरण म्हणजे शाहीद आफ्रिदी.आतापर्यंत मी खेळलेली सर्वोत्तम परदेशी लीग म्हणजे भारताची इंडियन प्रीमियर लीग असे या पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने सांगून टाकले आहे.
३२ वर्षीय अष्टपैलू खेळाडू आफ्रिदी येत्या ११ ऑगस्टपासून श्रीलंकन प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे. त्यासंदर्भात बोलताना आफ्रिदी आयपीएलचे गुणगान गायला. आफ्रिदी हा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश व भारत या चार देशांत टी-२० चॅम्पियनशिप खेळला असला तरी ’आयपीएल’ या भारतातील टी-२० चॅम्पियनशिपचे आयोजन आपणास सर्वोत्तम वाटते, असे आफ्रिदीने म्हणाला.
२००८ सालच्या पहिल्या ’आयपीएल’मध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा सहभाग होता. मात्र पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केल्यानंतर भारतातील फ्रँचाईझींनी (संघमालक) पाकिस्तानच्या कोणत्याही खेळाडूला करारबद्ध केले नव्हते. अपवाद फक्त माजी कसोटीपटू अझहर मेहमूदचा. या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये अझहर खेळला तो पाकिस्तानचा खेळाडू म्हणून नव्हे तर इंग्लंडमधील काऊंटी संघाचा खेळाडू या नात्याने.
