हरियाणाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा गूढ मृत्यू

चंदीगड: हरियानाचे माजी उपमुख्यमंत्री चंदर मोहन यांची एकेकाळची पत्नी अनुराधा बाली उर्फ फिजा मोहोम्मद हिचा मृतदेह सोमवारी सकाळी तिच्या घरात सडलेल्या अवस्थेत आढळून आला. तिने ३ ते ४ दिवसापूर्वी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा कयास आहे.

फिजा तिच्या आईच्या मृत्यूनंतर चंदीगडचे उपनगर असलेल्या मोहाली येथे एकटीच रहात होती. दोन दिवसापासून तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी तिचे काका सत्पाल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला असता तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून त्याचा अहवाल आल्यावरच बाबी अधिक स्पष्ट होतील; असे मोहालीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व्ही. एस. मान यांनी पत्रकारांना सांगितले.

पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात वकिली करणारी अनुराधा सन २००८ च्या सुरुवातीला गायब झाली आणि वर्षाअखेरीला परतली ती हरियानाचे प्रभावशाली नेते आणि माजी मुख्यमंत्री भजनलाल यांची सून म्हणून! भजनलाल यांचे पुत्र चंदर मोहन यांच्याशी तिने मीरत येथे गुप्तपणे विवाह केला. विवाहानंतर दोघांनी इस्लामचा स्वीकार करून आपली नावेही बदलली. चंदर चांद मोहम्मद झाले आणि अनुराधा फिजा. मात्र हा विवाह केवळ ४० दिवसच टिकला. त्यानंतर चंदर उर्फ चांद तिच्या घरातून बेपत्ता झाले. त्यानंतर दीर्घकाळ त्यांच्यात संपर्कही नव्हता. एक दिवस अचानक त्यांनी दूरध्वनीवरूनच फिजाला तलाक दिला. तसा एसएमएस देखील पाठविला.

सन २००९ मध्ये चांद पुन्हा अवतरले आणि त्यांनी तिची माफी मागून पुन्हा एकत्र राहण्यास सुरुवात केली. मात्र हे पुनर्मीलनही फार काळ टिकले नाही. चंदर हरियानातील आपल्या हिसार या गावी गेले आणि त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. त्यानंतर फिजा आणि चंदर यांचात काहीच संबंध उरला नाही.

असे खळबळजनक आयुष्य जगलेली फिजा तिच्या आईच्या मृत्यूनंतर एकाकी आणि नैराश्यग्रस्त झाल्याचे तिचे शेजारी सांगतात. अनेकदा ती शेजाऱ्यांबरोबर भांडणे उकरून काढत असे. याबद्दल तिला कोठडीची हवाही खावी लागली.

या नैराश्यग्रस्त मन:स्थितीतच तिने आपले आयुष्य संपविले असावे. तिच्या जगण्याप्रमाणे तिचे मरणही गूढच ठरले.