मानवरहित मायक्रो विमान कामगिरीसाठी सज्ज

लंडन दि.४ – ब्रिटनमधील कार्डिफ बीबीसी इंटरनॅशनल विद्यापीठातील संशोधकांनी अवघ्या १९८ ग्रॅम वजनाचे मानवरहित हेरगिरी विमान तयार करण्यात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे या विमानाच्या अमेरिकेकडून ज्या ज्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात हे विमान सर्व कसोट्यांस उतरले आहे. त्यामुळे या विमानाचा वापर आता तालिबानी संघटनेच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी प्रामुख्याने केला जाणार आहे. एस क्यू -४- रिकॉन असे या नॅनो साइजच्या विमानाचे नामकरण करण्यात आले आहे.

या विमानाचा वापर प्रामुख्याने अफगाणिस्तानात करण्यात येणार आहे कारण तेथे तालिबानी हल्ल्यात सैनिक मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.डोंगरी भागातही हे विमान उत्तम प्रकारे हेरगिरी करू शकणार असल्याने अफगाणिस्तानातील सैनिकांचा जीव तालिबानी हल्ल्यातून वाचविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

या विमानाविषयी अधिक माहिती देताना बीबीसी इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक अँड्रयू  हॉवेल म्हणाले की ब्रिटीश गुप्तहेर एजंट ००७ उर्फ जेम्स बॉण्ड याच्या यू ओन्ली लिव्ह ट्वाईस या चित्रपटात अशा छोट्या विमानाचा वापर केला गेला होता. त्या पद्धतीचेच हे विमान असून त्याला पक्षासारखे दिसणारे दोन पंख आहेत. त्यावर बसविलेले दोन कॅमेरे अतिशय पॉवरफुल असून शत्रूच्या बारीक सारीक हालचालीही हे कॅमेरे अचूक टिपू शकतात. आता प्रत्यक्षात हे विमान त्याची कामगिरी कशी पार पाडते हे लवकरच कळून येईल.