भारताचे लक्ष्य अव्वल स्थानावर

श्रीलंकेसोबतचा आजचा शेवटचा सामना जिंकून वनडेच्या जागतिक क्रमवारीत नंबर एकवर टीम इंडियाला पोहोचता येणार आहे. भारत सध्या ११७ रेटिंग गुण घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर हा शेवटचा सामना भारताने जिंकला तर भारताचे ११९ रेटिंग गुण होणार आहेत. त्यामुळे भारत ११९ रेटिंग गुण घेऊन ऑस्ट्रेलियाची बरोबरी साधेल. मात्र भारताचे एकूण अंक ७११६ आहेत तर ऑस्ट्रेलियाचे ६२८७ अंक असल्याने नंबर एकचे स्थान कुणाकडे राहणार हे सध्या तरी सांगता येणे थोडेसे कठीण आहे . श्रीलंकेसोबतची पाच सामन्याची मालिका टीम इंडियाने जिंकून वनडेमध्ये ४०० सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे.
टीम इंडियाने आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात ८०८ वनडे सामन्यापैकी ४०० सामने जिंकले आहेत. ४०० सामन्यात विजय मिळवणारा भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला असताना आता वनडेच्या जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळवण्याची संधी चालून आली आहे. गेल्या काही दिवसापासून जागतिक क्रमवारीत भारतीय संघाची घसरण झाली होती हे स्थान परत मिळवण्याची संधी आता चालून आली आहे.
त्यासोबतच या मालिकेत दोन शतके झळकाविनाऱ्या विराट कोहलीला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविण्याची संधी प्राप्त झाली आहे. हशीम अमला आणि विराटमध्ये २५ गुणाचे अंतर असून या शेवटच्या सामन्यात हे अंतर तो कापेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment