विजेंदर सिंगची क्वार्टर फायनलमध्ये एन्ट्री

ऑलिम्पिक स्पर्धेतील बॉक्सिंगमध्ये ७५ किलो वजन गटात भारताच्या विजेंदर सिंगने अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी टेरेल गोशावर १६-१५ ने मात करीत क्वार्टर फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. यापूर्वी दमदार कामगिरीच्या जोरावर २६ वर्षीय विजेंदरने बीजिंग येथील ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते.

या साखळी सामन्यात विजेंदरने सुरुवातीपासून उत्साहवर्धक खेळी करीत प्रतिस्पर्ध्यांला जखडून ठेवले पहिल्या गेममध्येच विजेंदरने १ गुणाची आघाडी घेतली होती. त्या एक गुणाच्या मिळालेल्या आघाडीमुळेच त्याला विजय मिळवत आला. दुसऱ्या गेममध्ये गोशाने पुन्हा थोडासा आक्रमक खेळ करीत ५-५ अशी बरोबरी साधली होती. तिसऱ्या व अतिम गेममध्ये विजेंदरने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करण्याची रणनीती आखली होती. गोशाने थोडा फार प्रतिकार केला मात्र विजेंदरच्या खेळीपुढे त्याचे काहीच चालले नाही.

आता क्वार्टर फायनलमध्ये विजेंदरचा मुकाबला उज्बेकिस्तानच्या अबोस एतोइव सोबत होणार आहे. यापूर्वी विजेंदरने हाताला जखम झाली असतानाही उज्बेकिस्तानच्या अबोसचा आशिया कपच्या सामन्यात ७-० असा पराभव केला होता. त्यामुळे क्वार्टर फायनलच्या या सामन्यात विजेंदरचे पारडे जड राहणार आहे.

Leave a Comment