वीज संकटामुळे देशाची पत घटली: मूडी

नवी दिल्ली: निम्म्या देशाला अंधाराच्या खाईत ढकलणार्या ग्रीड बिघाडामुळे जागतिक बाजारपेठेतील देशाची पत ढासळली असून भारतातील पायाभूत सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे; असे जागतिक मानांकन संस्था मूडीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दि.३० आणि ३१ जुलै रोजी उत्तर, पूर्व आणि ईशान्य ग्रीड मध्ये गंभीर बिघाड होऊन देशातील निम्मी जनता अंधारात राहिली. या घटनेमुळे भारतातील पायाभूत सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असून विदेशी गुंतवणुकीवर त्याचे अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता मूडीने वर्तविली आहे. विकासदर वृद्धीला बसलेली खीळ, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याबाबत शासकीय पातळीवर असणारी उदासीनता या पार्श्वभूमीवर निर्माण झालेले वीज संकट देशाची प्रतिमा आणखी डागाळणारे ठरले आहे.

कोळशाचा अनियमित पुरवठा, आयात केलेले इंधन वीज उत्पादन प्रकल्पांपर्यंत पोहोचविण्यासाठी दळणवळणाच्या सामग्रीचा अभावआणि अविश्वासार्ह वितरण व्यवस्था ही भारतीय उर्जा क्षेत्रापुढील आव्हाने आहेत. वीज गळती, वीज चोरी आणि भ्रष्टाचार या समस्यांवर देखील प्रभावी उपाय शोधून काढणे उर्जा क्षेत्रासाठी आवश्यक आहे; असे मूडीने अहवालात नमूद केले आहे.

Leave a Comment