इस्लामाबाद: दहशतवादी कृत्यांसाठी पैसा गोळा करण्याचा ‘ऑनलाईन’ मार्ग पाकिस्तानातील जहाल दहशतवादी संघटनांनी शोधला आहे. धार्मिकतेचा बुरखा घेऊन स्थापना करण्यात आलेल्या संस्थेला धार्मिक उपक्रम आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी देणग्या देण्याचे आवाहन जगभरातील मुस्लिमांना सोशल वेबसाईट्सच्या माध्यमातून केले जात आहे. प्रत्यक्षात या देणग्या दहशतवादी संघटना घातपातासाठी उपयोगात आणतात.
इस्लाममधील रमझान महिन्याचे धार्मिक महत्व लक्षात घेउन पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी ‘जकात’च्या नावाखाली देणग्या जमा करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या उत्पन्नातील ठराविक भाग सामाजिक जाणीव आणि जबाबदारी म्हणून सामाजिक कामाला अर्पण करण्याची शिकवण इस्लाममधील ‘जकात’ या संकल्पनेतून दिली आहे. रमझानच्या महिन्यात अधिकाधिक पुण्यकर्म करण्याचाही मुस्लीम बांधवांचा प्रयत्न असतो. या धार्मिक भावनांचा लाभ उठवून लष्कर ए तैय्यबा, जमात उद दावा या दहशतवादी संघटना निधी जमविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जगभरातील मुस्लीम बांधवांना देणग्या मागण्यासाठी ‘फलाह ए इन्सानियत’ या बोगस धार्मिक संस्थेच्या नावाचा वापर करीत असून प्रत्यक्षात ही संस्था हा लष्कर ए तैय्यबाचा मुखवटा आहे. फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून या देणग्या देण्याचे आवाहन केले जात आहे.