
नवी दिल्ली: अण्णा समर्थकांनी आंदोलनादरम्यान माध्यमाच्या विरोधात कृत्य केल्यास अथवा माध्यम प्रतिनिधींचा अवमान केल्यास अथवा आंदोलनाला हिंसक वळण दिल्यास आंदोलन मागे घेतले जाईल; असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला.

नवी दिल्ली: अण्णा समर्थकांनी आंदोलनादरम्यान माध्यमाच्या विरोधात कृत्य केल्यास अथवा माध्यम प्रतिनिधींचा अवमान केल्यास अथवा आंदोलनाला हिंसक वळण दिल्यास आंदोलन मागे घेतले जाईल; असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला.
टीम अण्णाच्या लोकपालाच्या मागणीसाठी टीम अण्णाने सुरू केलेल्या आंदोलनाला जनसामान्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची वृत्त माध्यमांकडून प्रसिद्ध होत आहेत. या प्रकारच्या बातम्यांमुळे काही अण्णा समर्थक बिथरले. माध्यमांकडून जनतेची दिशाभूल होत असल्याचा आरोप त्यांनी केला. काही समर्थकांनी फलकाद्वारे माध्यमांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीचे कुत्रे अशी संभावना केली. काहींनी तर माध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की केली.
या प्रकाराबाबत माध्यमाच्या प्रतिनिधींनी टीम अण्णा आणि स्वत: अण्णांकडे नाराजी व्यक्त केली. ब्रॉडकास्ट एडिटर्स असोसिएशनने या संदर्भात अण्णांना पत्रही दिले. माध्यमांना लक्ष्य करण्याबद्दल अण्णांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली. त्या नुसार मंगळवारी सकाळी स्वत: अण्णा आणि टीम अण्णाचे ज्येष्ठ सदस्य अरविंद केजरीवाल यांनी व्यासपीठावरून माध्यमांची जाहीर माफी मागितली. माध्यम हा लोकशाहीचा चौथा आणि अत्यंत महत्वाचा स्तंभ असून त्याबद्दल आपल्याला आदर आहे; असे अण्णांनी यावेळी सांगितले.
दरम्यान; जंतर-मंतरवर अण्णांच्या उपोषणाला दोन दिवस उलटले तरी आतापर्यंत सरकारकडून टीम अण्णांशी चर्चा करण्याचा कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नाही सध्या सरकार टीम अण्णाशी चर्चा करण्याच्या मूडमध्ये नाही; असे सूत्रांनी स्पष्ट केले. केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी; आमचे देखील रोजे सुरू आहेत; असे उपहासात्मक वक्तव्य करून टीम अण्णांच्या उपोषणाची टर उडविली.
सूचना प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनी मात्र चर्चेचे मार्ग खुले असल्याचे स्पष्ट केले.
अंबिका सोनी यांनी चर्चेच्या शक्यतेचे सूतोवाच केल्यावर टीम अण्णाच्या ज्येष्ठ सदस्य किरण बेदी यांनी चर्चेची तयारी दाखविली मात्र कथित भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीसाठी विशेष पथकाची स्थापना आणि लोकपाल विधेयक या मागण्यांपासून टीम अण्णा तसूभरही मागे हटणार नाही; असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.