मेहसाणा,दि.३१ – मेहसाणाच्या दीपडा दरवाजात २८ फेब्रुवारी २००२ साली एका कुटुंबातील ११ लोकांची हत्या करण्यात आली होती. मृतांमध्ये दोन मुले आणि ६५ वर्षीय महिलेचाही समावेश होता. याप्रकरणी प्रथम ८३ लोकांविरुद्ध आरोप निश्चित केले होते. यात तीन महिलांचाही समावेश होता, परंतु कोर्टाने पीडित मोहम्मद इकबाल बलूचची याचिका स्वीकार करत भाजप आमदार प्रल्हाद गोसा आणि विसनगर गावाचे माजी पोलिस अधिकारी एम.के. पटेलवरही आरोप निश्चित केले. अशा प्रकारे आरोपींची संख्या ८५ झाली.
गुजरात दंगलीदरम्यान, मेहसाणा जिल्ह्यात ११ लोकांची हत्या केल्याप्रकरणी २२ लोकांना दोषी ठरविण्यात आले आहे. मेहसाणाच्या विशेष न्यायालयाने ६१ जणांना निर्दोष ठरवले. ज्या लोकांना निर्दोष ठरविण्यात आले आहे, त्यात भाजप आमदाराचाही समावेश आहे. कोर्टाने २१ जणांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे, तर अन्य एकास कर्तव्यहीनतेचे दोषी ठरवले आहे. ज्यास कर्तव्यहीनता प्रकरणी दोषी ठरवले आहे, तो माजी पोलिस अधिकारी आहे. या अधिकार्याने प्रकरणाच्या चौकशी दरम्यान बेजबाबदारपणा बाळगला होता.
ज्या लोकांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत, त्यांच्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश होता. यावर कोर्टाने त्याच्याविरुद्ध जूवेनाइल कोर्टात खटला चालविण्यास सांगितले. अन्य एका आरोपीचा प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, मृत्यू झाला. दीपडा दरवाजा केसचा तपास सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त एसआयटीने केला होता.