ओबामा यांच्याकडून नागरिकांचा अपेक्षाभंग: बॉबी जिंदाल

वॉशिंगटन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून अमेरिकन नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यांना निर्णायक मते देणारे आयोवाचे मतदारच आगामी अध्यक्षीय निवडणुकीत त्यांना नाकारून इतिहास घडवतील; अशी टीका भारतीय वंशाचे लुईसियाना प्रांताचे गव्हर्नर बॉबी जिंदाल यांनी केली.

आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि ओबामा यांचे प्रतिस्पर्धी मिट रोमनी यांच्या प्रचाराची धुरा जिंदाल यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. जिंदाल यांनी आयोवामध्ये दोन प्रचारसभा घेतल्या. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की; चार वर्षापूर्वी आयोवाच्या नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने ओबामा यांना विजयी केले. मात्र आता आयोवाच्या नागरिकांचा ओबामा यांच्याकडून भ्रमनिरास झाला आहे. या निवडणुकीत मतदार त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.

जिंदाल हे उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचे दावेदार असून एका आठवड्यात त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.