टीम अण्णाला रामदेवबाबांचा आधार

नवी दिल्ली: टीम अण्णाने नवनिर्वाचित राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर केलेली टीका रुचलेली नसल्याचे त्यांनी रामलीला मैदानावर आयोजित कार्यक्रमात सांगितले. देशाचे राष्ट्रपती हे घटनात्मक सर्वोच्च पद आहे. त्यावर टीका करणे योग्य नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमानंतर रामदेवबाबा जंतर मंतर येथे टीम अण्णाच्या आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे जंतर मंतर मैदानावरील मरगळ दूर झाली आणि आंदोलनाच्या सुरुवातीपासून या आंदोलनापासून दूर असलेले सर्वसामान्य नागरिक आंदोलनस्थळी दाखल झाले. वास्तविक रामदेवबाबा या आंदोलनात सुरुवातीपासून सहभागी होणे अपेक्षित होते. मात्र टीम अण्णामधील काही ज्येष्ठ व्यक्तींच्या विरोधामुळे ते सहभागी झाले नाहीत अशी चर्चा होती. मात्र आंदोलनाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे रामदेवबाबांना पाचारण करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

लोकपाल विधेयक आणि विदेशातील काळा पैसा परत देशात आणण्यासाठी जनतेचा रेटा आवश्यक असल्याचे रामदेवबाबांनी यावेळी सांगितले.