तटकरे आणि भुजबळांची भ्रष्टाचारात भागीदारी

पुणे: महाराष्ट्रात मंत्रीपद भूषविणारे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे दहा हजार कोटी रुपयांचे घोटाळे आपण उघड केले. मात्र आता काही बोगस कंपन्यांमध्ये भुजबळ आणि तटकरे यांची भागीदारी असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे; असा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी पत्रकारांशी बोलताना केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असल्यानेच त्यांनी दिल्लीत दबाव नाट्य केल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. या मंत्र्यांच्या विरोधात राज्यपालांकडे दाद मागण्यासह मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही सोमैय्या यांनी दिला.

मंत्र्यांच्या घरी माळीकाम करणारा कामगार ,लिपिक महिला आणि मंत्र्यांचे नातेवाईक हे अनेक कंपन्यांमध्ये संचालक दाखविण्यात आले असून या कंपन्यांचा कागदोपत्री पत्ता नवी मुंबईत दाखविण्यात आला आहे. मात्र या पत्त्यावर भलतीच व्यक्ती राहत असून तिला या कंपन्यांबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सोमैय्या यांनी निदर्शनास आणून दिले.

तटकरे यांची पुण्यात सर्वात महाग अशा हिंजवडी भागात इनोव्हेटीव्ह कोर्पोरेशन कंपनीची दहा लाख चौरस फुटाची ५०० कोटी रुपयांची गृहरचना संस्था आकाराला येत असून प्रत्यक्षात कागदोपत्री तो प्रकल्प केतन गोराडीया यांच्या नावावर आहे. त्यात मंत्र्यांकडे माळीकाम करणारा कामगार आणि कारकून महिला भागीदार आहे; असा आरोप सोमैय्या यांनी केला.

तटकरे यांचा माळी किरण सारंग हा संचालक असलेल्या तब्बल २४ कंपन्या अस्तित्वात असून त्यापैकी काही कंपन्यांचा पत्ता कोलकाता येथील दाखविण्यात आला आहे.

तटकरे आणि भुजबळ यांच्या भागीदारीतील कंपन्यांचा पत्ता बी-४०९, कोरल क्रेस्ट सोसायटी,सेक्टर २३, नेरूळ असा दिला आहे. या जागेत अब्दुल कुडूस राहत असल्याचे सोसायटीच्या नोंदीत आहे. प्रत्यक्षात त्या ठिकाणी परवेझ नावाची व्यक्ती राहत असून त्यांना या पत्त्यावर नोंदविण्यात आलेल्या मंगल सागो, नेस्ट टेक्नोलोजी, मिनू या कंपन्यांबद्दल काहीही माहिती नसल्याचे सोमैय्या म्हणाले.

Leave a Comment