सांस्कृतिक राजधानीत विकसित होतायत सीन सिटीसाठी केसिनो गेम्स!

पुणे: भारतात केसिनो; अर्थात यांत्रिक जुगाराला परवानगी नसली तरीही लास वेगास आणि मकाऊ या ‘सीन सिटीज’मधील केसिनोचे सुप्त आकर्षण अनेकांच्या मनात असते. मात्र सांस्कृतिक राजधानीचे बिरूद मिरविणाऱ्या पुणे शहरात केसिनोच्या यंत्रासाठी आवश्यक संगणकप्रणाली विकसित केल्या जात असून पुण्यातील संगणक अभियंत्यांचे कौशल्य आणि त्यांची उपलब्धता लक्षात घेता डब्ल्यूएमएस या केसिनो गेम्स विकसित करणाऱ्या कंपनीने पुण्यात आपली क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतात एनिमेशन आणि चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्सच्या व्यवसायाने पुण्यात मूळ धरले असले तरीही केसिनो गेम्स पुण्यात विकसित केले जातात ही बाब तशी धक्कादायकच! अमेरिकेत केसिनो गेम्स लोकप्रिय आहेत. मात्र हे गेम्स मोठ्या संख्येने पुण्यात विकसित केले जातात. त्यासाठी डब्ल्यूएमएसने येरवडा येथे आपले केद्र सन २०१० मधेच सुरू केले आहे. या केंद्रात सुरुवातीला ५० जण केसिनो गेम्स विकसनाचे काम करीत होते. सध्या ८० जण कार्यरत असून वर्ष अखेरीला ही संख्या १४० वर नेली जाणार आहे. भविष्यातील वाढीचा विचार करून या केंद्रात २१० तंत्रज्ञ काम करू शकतील अशा सुविधा करण्यात आल्या आहेत; अशी माहिती कंपनीचे भारतातील प्रमुख फक्रुद्दीन चोपडावाला यांनी पत्रकारांना दिली.

डब्ल्यूएमएसने पुण्यात १०० केसिनो गेम्स विकसित केले असून जगभरातील ३०० ठिकाणी ते बसविण्यात आले असल्याचेही चोपडावाला यांनी सांगितले.