रेव्ह पार्टी प्रकरणातील दोषी राहुलची सौरवदा कडून पाठराखण

मुंबई: रेव्ह पार्टीमध्ये सामील होऊन अमली पदार्थाची नशा करणारा भारतीय लेग स्पिनर राहुल शर्मा याने तारुण्याच्या उन्मादात चूक केली असून त्याला टीममधून वगळण्याएवढी मोठी शिक्षा देऊ नये; असे आवाहन भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने केले आहे. या चुकीपासून राहुल निश्चितपणे धडा घेईल; अशी आशाही त्याने व्यक्त केली.

राहुल शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू बेन पार्नेल यांना जुहू येथील ओकवूड हॉटेलमध्ये २० मे रोजी रेव्ह पार्टी दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या पार्टीत राहुलने अमली पदार्थाचे सेवन केल्याचे रक्त आणि मूत्र चाचणीत दिसून आले आहे. याबाबत कठोर कारवाई करण्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिले आहेत. मात्र एका वृत्त वाहिनीकडे याबाबत बोलताना सौरव’दादा’ राहुलची पाठराखण करण्यास सरसावला आहे.

तारुण्याच्या भरात काही खेळाडू अशी चूक करू शकतात. मात्र त्यांना टीमच्या बाहेर काढून त्यांचे भवितव्य धोक्यात आणण्याएवढी गंभीर शिक्षा करू नये. जाणीव होईल इतपत शिक्षा करून बीसीसीआयने त्यांना अशा चुकांपासून परावृत्त करावे; अशी अपेक्षा गांगुलीने व्यक्त केली आहे.

Leave a Comment