काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील धुम्मस निवळली

नवी दिल्ली: गेले काही दिवस राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांमध्ये सुरू असलेली धुम्मस अखेर निवळली आहे. बुधवारी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्रीय कृषिमंत्री आणि ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे निकटवर्तीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आला नसला तरीही आता सगळे वाद मिटल्याचे सांगण्यात आले.

केंद्रात युपीएमध्ये समन्वय साधून सरकारचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठी समन्वय समिती नेमली जाणार आहे. दर महिन्याला या समितीची बैठक घेऊन सहमतीने पुढची दिशा ठरविली जाईल.

केंद्राप्रमाणेच राज्यातही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी अशी समिती नेमली जाईल; असे निर्णय या बैठकीत झाल्याचे पटेल यांनी बैठकी नंतर पत्रकारांना सांगितले.राज्यात नेतृत्वबदल करण्यात आम्हाला रस नाही. केवळ समन्वयाने प्रभावी कारभार चालावा एवढीच आमची इच्छा असल्याचेही पटेल यांनी नमूद केले.

यूपीए सरकारवर नाराज असलेले केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व त्यांचे विश्वासू सहकारी प्रफुल्ल पटेल बुधवारी सायंकाळी पाच वाजता पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांची भेट घेऊन ४० मिनिटे चर्चा केली. त्यानंतर शरद पवार यांच्या ६ जनपथ या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला पवार, पटेल यांच्यासह खासदार डी. पी. त्रिपाठी, तारिक अन्वर आदी नेते उपस्थित होते.

गेल्या शुक्रवारपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसने यूपीए सरकारच्या सर्व सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तसेच पवार यांनी यूपीए सरकारसमोर आपल्या काही मागण्या ठेवल्या आहेत. त्या मागण्याबाबत पंतप्रधान मनमोहनसिंग व सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली जाऊ शकते. आघाडी सरकार चालविताना घटक पक्षांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जात नाही, असे राष्ट्रवादीने म्हटले होते. तसेच याबाबत गुरुवारपर्यंत निर्णय घ्या नाहीतर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा अल्टिमेटम राष्ट्रवादीने कॉंग्रेसला दिला होता.