पवारांची दबावाची खेळी सुरूच

नवी दिल्ली: राजीनामा नाट्याने राजधानीतील राजकीय वातावरण तापविल्यानंतरही कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकार आणि काँग्रेस यांच्यावरील दबावाची टांगती तलवार कायम ठेवली आहे. पवार यांच्या नाराजीचे नाट्य राजधानीत अजूनही सुरूच आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांने नाकदुर्या काढूनही पवारांचा क्रोधाग्नी शांत झालेला नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक सोमवारी नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत सरकारमधून बाहेर पाडून बाहेरून पाठिंब्याचा निर्णय जाहीर होईल; अशी हवा तापविण्यात आली. मात्र तसा कोणताही निर्णय या बैठकीत झाला नाही. आम्ही सन २०१४ पर्यंत युपीए बरोबर राहणार आहोत. मात्र सरकार मध्ये राहायचे की बाहेरून पाठींबा द्यायचा याचा निर्णय दोन दिवसात घेतला जाईल; असे पवारांचे निकटवर्तीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीनंतर सांगितले. मात्र हा निर्णय होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही; असेही ते म्हणाले.

Leave a Comment