चित्रपटगृहात गोळीबार करणाऱ्या माथेफिरूचा विदूषक असल्याचा दावा

डेनव्हर: येथील चित्रपटगृहात शुभारंभाच्या प्रयोगाच्या वेळी अंदाधुंध गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने आपण विदूषक असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याने आपले केसही सर्कशीतील विदूषकासारखे लाल रंगाने रंगविले आहेत.

शुक्रवारी बेटमेन या चित्रपट मालिकेतील दी डार्क नाईट राईजेस  शुभारंभाचा प्रयोग डेनव्हर येथील ऑरोरा परिसरातील चित्रपटगृहात होत असतानाच तेथे चेहेऱ्यावर वायू प्रतिबंधक मास्क आणि बुलेटप्रूफ जाकीट घातलेला माथेफिरू हल्लेखोर तीन रायफल घेऊन चित्रपटगृहात शिरला आणि त्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात १२ जण ठार तर ५८ जण जखमी झाले आहेत.

गोळीबार करून वाहनतळाच्या जागेत लपलेल्या या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली. त्याचे नाव जेम्स होम्स (वय २४) असल्याचे त्याने सांगितले. त्याने आपल्या घरात आणखी स्फोटके असल्याचे सांगितल्यावरून पोलिसांनी ती ताब्यात घेऊन निकामी केली. चित्रपटगृहात केलेल्या हल्ल्याचे कारण मात्र त्याने अजून सांगितले नाही. या हल्ल्यासाठी त्याने अधिकृत दुकानातून एआर-१५ रायफल, हेंडगन आणि सहा हजाराहून अधिक काडतुसे विकत घेतली असून ही शस्त्र पोलिसांनी हस्तगत केली आहेत.