गडचिरोली: छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या धानोरा तालुक्यातील कनेरीच्या जंगलात शुक्रवारी सकाळी नक्षलवादी आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक झाली. पूर्ण तयारीनिशी आलेल्या सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याने त्यांना पळ काढावा लागला.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलिसांची चकमक
कानेरीच्या जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मिळाली. सुरक्षा दलाचे पथक तत्काळ या ठिकाणी रवाना झाले. पोलिसांना पाहताच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबाराला चोख उत्तर दिले. अखेर जंगलाचा फायदा घेऊन नक्षलवाद्यांनी पळ काढला.
या चकमकीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले.
