एचआयव्हीचा संसर्ग पूर्णपणे नष्ट करणे शक्य: संशोधकांचा दावा

वॉशिंगटन: एचआयव्हीचा संसर्ग पूर्णपणे नष्ट करून आजपर्यंत असाध्य समजल्या जाणाऱ्या एड्स या जीवघेण्या रोगावर लवकरच उपचार करणे शक्य होईल; असा विश्वास एचआयव्ही विषाणूचा शोध लावण्यात महत्वाचे योगदान असलेल्या नोबेल पुरस्कार विजेत्या संशोधक फ्रेकायास सिनौसी यांनी व्यक्त केला.

येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एड्स परिषदेबाबत माहिती देताना त्या बोलत होत्या. या परिषदेला जगभरातून एचआयव्ही बाधित रुग्ण, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि डॉक्टर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.

एचआयव्हीचा विषाणू शरीरातून पूर्ण नष्ट होऊ शकतो; असे सांगताना त्यांनी बर्लिन येथील एका रुग्णाचे उदाहरण दिले. बोन मेरो प्रत्यारोपणाने हा रुग्ण एड्समुक्त होत असल्याचा दावा त्यांनी केला. फ्रांस येथे काही रुग्णांवर उपचार केल्यानंतर ते आता औषधाविना सामान्य जीवन जगत असून त्यांच्यात एचआयव्ही संसर्गाची कोणतीही लक्षणे नाहीत; असा दावाही त्यांनी केला.

एचआयव्ही संसर्गाचे सन २०५० पर्यंत निर्मूलन शक्य आहे. मात्र राजकीय आणि सामाजिक अडथळ्यामुळे या प्रयत्नांना मर्यादा पडत असल्याची खंतही सिनौसी यांनी व्यक्त केली. विशेषत: ग्रामीण भागापर्यंत एचआयव्ही निदान आणि उपचार पोहोचविण्याचे मोठे आव्हान आहे; असेही त्यांनी नमूद केले.