भारत पाक क्रिकेट मालिकेचे भवितव्य धूसर

नवी दिल्ली: मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानचे उदासीन धोरण आणि विविध स्तरावरून होत असलेली टीका या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान दरम्यान प्रस्तावित असलेल्या क्रिकेट मालिकेचे भवितव्य धूसर झाले असून ही मालिका रद्द होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट स्पर्धा अनेकदा राजकीय तणाव निवळण्यासाठीची मुत्सद्देगिरीची भूमिका निभावते. त्याच दृष्टीने डिसेंबर महिन्यात या दोन देशांदरम्यान एकदिवसीय मालिका खेळविण्याचे नियोजन भारतीय आणि पाक क्रिकेट बोर्डाने केले होते. मात्र या प्रस्तावाला सामान्य नागरिकांपासून ते राजकीय पक्षांपर्यंत सर्वांनी कसून विरोध केला आहे. खुद्द लिटल मास्टर सुनील गावसकर यांनीही एक मुंबईकर या नात्याने आपला या दौऱ्याला विरोध आहे; असे मत व्यक्त केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही या प्रस्तावाची कठोर शब्दात निर्भत्सना केली आहे. अन्य विरोधी पक्षांप्रमाणे सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनीही या दौऱ्याला विरोध दर्शविला आहे.

या पार्श्वभूमीवर या मालिकेला शासनाकडून हिरवा कंदील दाखविला जाणे मुश्कीलच असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Leave a Comment