अफवा पवारांच्या

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरदरावजी पवार यांच्या संबंधाने काही अफवा पसरल्या आणि पवारांनी या अफवांचे निराकरण केले. पवारांनी मंत्रिमंडळातल्या क्रमांक दोनच्या स्थानासाठी राजीनाम्याचे शस्त्र उगारले होते, असे त्यांच्या संबंधातल्या अफवांत म्हटले होते. पण पवारांनी या अफवांबाबत स्पष्टीकरण देताना आपण ‘अशा पदासाठी आणि क्रमांकासाठी कधी असे रागावत नसतो. आपण असल्या फालतू गोष्टीसाठी असे काही राजीनामे वगैरे देत नसतो’ असे म्हटले. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे अफवा बंद होतील, त्यांनी राजीनामा दिला होता ही अफवा चुकीची असल्याचे सर्वांना समजेल आणि गैरसमज निवळेल अशी आशा आहे. कारण पवारांनीच ही अफवा नाकारली आहे आणि पवार किती खरे बोलतात, हे सार्‍या आलम दुनियेला माहीत आहे. पवार बोलण्यात किती प्रामाणिक आहेत याचा अनुभव सर्वांनी नेहमीच घेतलेला असल्याने  अशा या एकवचनी नेत्याच्या शब्दावर अनेकांचा विश्‍वास आहे. म्हणून पवारांनी खुलासा केलाय म्हटल्यावर तो खराच असणार असे आता सगळेच लोक  समजून चुकणार आहेत.

पण एक खुलासा करताना पवारांनी स्वत: मात्र एक नवी अफवा तयार केली आहे. तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधावेसे वाटते. आपण पदासाठी आणि अशा क्रमांका सारख्या फालतू कारणासाठी राजीनामा वगैरे देत नसतो ही पवारांनीच तयार केलेली अफवा आहे.  आता ती पवारांनीच सोडलेली असल्याने ती ‘खरी अफवा’ असणार म्हणून तिच्यावर  त्यांच्या अनुयायांसह कोणाचाही विश्‍वास बसणार नाही. पवार पदासाठी काही करीत नसतात या अफवेचे निराकरणही करण्याची गरज नाही. कारण राजकारणातल्या त्यांच्या वाटचालीचा पन्नास वर्षांचा इतिहास साक्षी आहे. आताही त्यांनी क्रमांक दोन साठी राजीनामा दिला होता ही ‘खोटी अफवा’ होती यावर कदाचित  विश्‍वास बसेल पण त्यांना नंबर दोन नको आहे यावर मात्र कोणाचाही विश्‍वास बसणार नाही.  पवारांना काहीच नको असते आणि त्यांच्या मनात पदाविषयी एक प्रकारची संन्यस्त भावना असते यावर अन्य कोणाचाच काय पण त्यांचा स्वत:चाही विश्‍वास बसणार नाही. इतकी ही अफवा आहे. पवारांनी  राजीनामा दिलाय ही अफवा असू शकते. कारण पवार कधी पद सोडत नसतात. आताही त्यांनी पद सोडले असण्याचे शक्यता नाहीच कारण ते या मंत्रिमंडळात समाधानी आहेत.  त्यांच्या राजीनाम्याच्या  बातम्या नेमक्या कशाने सुरू झाल्या  हे पाहिले पाहिजे.

श्री. पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहिले नाहीत म्हणून पत्रकारांना ते राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत असे वाटले. पत्रकारांना तसे वाटावे अशी सारी राजकीय स्थिती आहेच. त्यामुळे बैठकीतली अनुपस्थिती आणि अनुकूल राजकीय स्थिती यातून राजीनाम्याच्या  अफवांना गती मिळाली. पण आपण वैयक्तिक कारणामुळे बैठकीला आलो नाहीत असे पवारांनी स्पष्ट केले. झाले. प्रकरण मिटले. दोन दिवस सनसनाटी बातम्या पसरल्या होत्या, चर्चेला वाव मिळाला होता ते सारे वातावरण एकदम शांत झाले.  पत्रकारांना काही कळत नाही, ते आपले काही तरी अफवा पसरवत असतात असे सर्वांना वाटून गेले. पण पवारांनी काही कोणा पत्रकाराला दोष दिला नाही. त्यांनी तसे का केले हे माहीत नाही; पण पवारांनी खुलाशाची वेळ मात्र नेमकी साधली. त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या बातम्या जोरात असताना त्यांचा खुलासा केला नाही. अफवांचे रूपांतर बातम्यांत झाले आणि बातम्या छापून येऊन त्यांचे विश्‍लेषण प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी हळूच आपला खुलासा बाहेर काढला. दरम्यानच्या काळात मोठमोठ्या बातम्या छापून आल्या. या काळात पवारसाहेब या बातम्यांचे परिणाम काय होतात हे पहात होते. आपल्या राजीनाम्याच्या अफवेने कोण कोण घाबरतात, संपुआघाडीची स्थिती कशी होते याचा आदमास ते घेत होते.त्या सार्‍या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झाल्या आहेत हे त्यांनी पाहिले आणि नंतर हळूच आपण राजीनामा वगैरे काही देणार नाही आणि दिलेलाही नाही असे स्पष्ट केले. 

या अफवा पवार साहेबांना हव्याच होत्या, असे कोणी म्हटले तर त्याला फार चूक म्हणता येणार नाही. किंबहुना त्या त्यांनीच करायला लावल्या असेही शक्य आहे. त्यांना त्या हव्याच होत्या म्हणूनच त्यांनी अफवांनी वातावरण ढवळून निघायची आणि ते निवळण्याची वाट पाहिली. आपल्या राजीनाम्याच्या अफवेनेही सरकार हादरते हे त्यांना बघायला मिळाले. आपले उपद्रव मूल्य असे सिद्ध झाल्याने ते खूष झाले. त्यांना प्रत्यक्षात  राजीनामा द्यायचा नव्हताच. त्यामुळे राजीनामा देण्याची गरज नव्हती. आता अफवांपासून स्पष्टीकरणापर्यंत काय झाले ते मनमोहनसिंग आणि पवारांनाच माहीत आहे. दिल्लीतले काही लोक पवारांच्या राजकारणाचा एक भाग म्हणून अशा अफवा पसरवत असावेत असाही काही लोकांचा आरोप आहे. या अफवांच्या मागेही एक राजकीय डाव असतो. तसा तो नसता तर पवारांनी पहिल्याच दिवशी खुलासा केला असता.

Leave a Comment