शरद पवारांच्या राजीनामानाट्याची यशस्वी सांगता

नवी दिल्ली: केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर नेहेमीच्याच धक्का तंत्राने दबाव टाकून त्यांना एक पाऊल मागे येणे भाग पाडले. मंत्रिमंडळातील दुसर्या स्थानाचा निकाल लावण्यासाठी सोनियांनी पवारांसह तीन मंत्र्यांची समितीच नियुक्त केली असून पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत ही समिती महत्वाचे निर्णय घेईल असे ठरविण्यात आले. अर्थात राजीनामा नाट्यातून पवार यांनी इतके मर्यादित साध्य साधले असेल यावर जाणकारांचा विश्वास नाही. त्यांनी आणखी काय काय पदरात पाडून घेतले हे समजण्यास काळ जावा लागणार आहे.

उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी घोषित करण्याच्या बैठकीला आणि गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहून पवारांनी आपला असंतोष व्यक्त केलाचं होता. शुक्रवारी तर पवार आणि अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्याही प्रसारित होण्यास सुरुवात झाली. दबाव नाट्याला अनुकूल परिस्थिती तयार झाल्यावर पवार यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत युपीएच्या आगामी धोरणे आणि वाटचालीविषयी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र पवार दुसर्या क्रमांकाचा आपला मुद्दाच नव्हता; असे आता सांगत असले तरीही पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत पवार, लोकसभेतील सभागृह नेते आणि ए.के. अंथोनी निर्णय घेतील असा मार्ग काढण्यात आला. 

Leave a Comment