
लंडन दि.१९ – लंडन ऑलिंपिकससाठी दाखल झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या बॅडमिंटन चमूतील तीन खेळाडूंना अन्नातून विषबाधा झाली असल्याचे समजते.सेंट्रल इंग्लीश सिटी ऑफ डर्बी येथील ऑलिंपिक प्रशिक्षण केंद्रात या टीमचा सराव सुरू आहे. बुधवारी पुरूष दुहेरीतील रॉस स्मिथ आणि ग्लेन वार्फ या दोघांना तसेच महिला सदस्य रेनुगा वीरन या तिघांना अचानक त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांना बोलावून उपचार करावे लागले. डॉक्टरांनी त्यांना अन्नविषबाधा झाल्याचे निदान करून पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे या तिघांनाही इंग्लंड बरोबर होणार्या वॉर्म अप मॅचला मुकावे लागले असे ऑस्ट्रेलियन टीम मॅनेजर लास बंडगार्ड यांनी सांगितले.
