एन.जी.ओ. व्यवस्थापन

केंद्र सरकारने नुकतीच देशातल्या स्वयंसेवी संघटनांची यादी आणि त्यांना परदेशातून मिळणारी मदत जाहीर केली आहे. भारतामध्ये जवळपास १४ लाख स्वयंसेवी संघटना (एन.जी.ओ.) आहेत आणि त्या समाजाच्या भल्यासाठी अनेक प्रकारची कामे करीत असतात. सरकारनेही अलीकडच्या काळात अशा संघटनांना सोबत घेऊन सरकारचे काही प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एनजीओंच्या कार्याची व्याप्ती प्रचंड वाढत चालली आहे. सरकारच्या योजनांशिवाय इतरही अनेक समाजोपयोगी उपक्रम या संस्थांकडून राबवले जातात आणि त्यातल्या अनेक उपक्रमांना शासनाकडून अनुदानही दिले जाते. अशा प्रकारचे अनुदान अब्जावधी रुपयांमध्ये आहे. परंतु ही अनुदाने घेणार्‍या संस्था योग्य प्रकारे काम करतात का, आणि त्यांना मिळणार्‍या अनुदानाचा योग्य तो उपयोग होतो का? याची चाचपणी कोणीही करत नाही. सरकारच्या पातळीवर या संस्था, त्यांचे उपक्रम आणि त्यांना दिला जाणारा निधी याबाबतीत ‘आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं’ अशी झालेली आहे. या स्वयंसेवी संघटनांचे व्यवस्थापन नीट केले गेले तर या अनुदानाला आणि पैशाला न्याय मिळणार आहे. पण या स्वयंसेवी संघटनांनासुद्धा आपले काम समाधानकारकरित्या करता येणार आहे. म्हणूनच एनजीओ मॅनेजमेंट अशा प्रकारचा एक अभ्यासक्रम करिअरच्या क्षेत्रामध्ये निर्माण झाला आहे.

सामाजिक काम करण्याची आवड असणार्‍या तरुणांना हे क्षेत्र आव्हान म्हणून पुढे आलेले आहे. भारतामधल्या काही विद्यापीठांनी एनजीओ मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. हैदराबाद येथील सेंटर फॉर सोशल इनिशिएटीव्ह ऍन्ड मॅनेजमेंट या संस्थेने एनजीओ मॅनेजमेंटचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. एक वर्षाच्या या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या तरुणांना प्रवेशासाठी कोणत्याही शाखेची पदवी मिळवावी लागेल. अधिक माहिती मिळवू इच्छिणार्‍यांनी www.csim.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. दिल्लीच्या ऍमिटी युनिव्हर्सिटीने एनजीओ मॅनेजमेंटचा पदव्युत्तर पदविकेचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. तोही एक वर्षाचा असून प्रवेश  घेऊ इच्छिणार्‍या तरुणांना कोणत्याही शाखेची पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी  www.amity.edu या संकेतस्थळावर संपर्क साधायला हरकत नाही. दिल्लीच्याच जामिया मिलीया इस्लामिया या विद्यापीठाने अशाच प्रकारचा पदव्युत्तर पदविकेचा कोर्स सुरू केलेला आहे आणि तो अर्धवेळ शिक्षण घेऊ इच्छिणार्‍यांसाठी आहे. मात्र, या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍यांना दोन वर्षाचा कामाचा अनुभव असण्याची गरज आहे. अधिक माहितीसाठी http//jmi.ac.in या पत्त्यावर संपर्क साधावा.

Leave a Comment