पंतप्रधानांना टीकेची नव्हे तर पाठिंब्याची आवश्यकता: रतन टाटा

नवी दिल्ली: पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर सरकारच्या निष्क्रीयतेबाबत देशा-विदेशातू टीकेची झोड उठत असली तरीही उद्योगपती रतन टाटा यांनी पंतप्रधानांना टीकेची नव्हे तर पाठिंब्याची आवश्यकता आहे; असे सांगून त्यांची पाठराखण केली आहे. अंतर्गत राजकारणाने देशाचे नुकसान होत असल्याचे सांगून त्यांनी विरोधी पक्षांवरही ताशेरे ओढले.
     सरकार निष्क्रीय असल्याबद्दल पंतप्रधानांवर सर्व स्तरातून टीका होत असताना रतन टाटा यांनी ट्विटरवर सिंग यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. ‘एक वर्षापासून देशात विकासदरात घट, महागाईत प्रचंड वाढ अशा समस्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांपासून ते विदेशी गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांचा शासनावरचा विश्वास उडत चालला आहे. छोटी छोटी पावले उचलण्यासही शासकीय पातळीवर विलंब होत आहे. मात्र या सर्वासाठी एकट्या पंतप्रधानांना दोषी ठरविणे ही दिशाभूल आहे; असे मत टाटा यांनी व्यक्त केले आहे. लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करून देशाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी पंतप्रधानांनी योग्य पावले उचलावीत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या कसोटीच्या काळात पंतप्रधानांना पाठिंब्याची आवश्यकता असून पंतप्रधानांनी देशाचे अर्थकारण पुन्हा मार्गी लावण्यासाठी कठोर धोरण स्वीकारावे; असेही टाटा यांनी म्हटले आहे.