राहुल गांधीं काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी ?

नवी दिल्ली दि.१८- युवराज राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षात अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यानंतरचे दुसरे महत्त्वाचे स्थान देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. युवराजांना काँग्रेसचे उपाध्यक्षपद अथवा कार्यकारी अध्यक्षपद अशी नवी भूमिका या नव्या जबाबदारीमुळे सांभाळावी लागणार आहे. येत्या सप्टेंबरमध्ये नव्या जबाबदारीची माळ युवराजांच्या गळ्यात घालण्यात येणार आहे.

काँग्रेसमधील वरीष्ठ नेते सलमान खुर्शीद तसेच दिग्विजयसिह यांनी यापूर्वीच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांनंतर महासचिव राहुल गांधी नव्या भूमिकेत दिसतील असे सूतोवाच केले होतेच. राहुल गांधी यांच्यावर नवी जबाबदारी कोणती सोपविली जाईल या चर्चेने वेग घेतला असतानाच आता ही बातमी आली आहे.

लोकसभेच्या २०१४ सालात होत असलेल्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. सध्या एकूण परिस्थिती पाहता या निवडणुका काँग्रेसला चांगल्याच जड जाणार आहेत हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. मात्र पक्षात कांही बदल करून पक्षाला बळ मिळविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात असून राहुल गांधीवर सोपविण्यात येणारी महत्त्वाची जबाबदारी व त्यासाठी त्यांना देण्यात येणारे पद हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे असे सांगण्यात येत आहे.