बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना काळाच्या पडद्याआड

मुंबई दि.१८- सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने गारूड केलेले आणि पहिले सुपरस्टार ठरलेले अभिनेते राजेश खन्ना यांचे आज त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते. गेल्या महिन्यात चार वेळा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. नुकतेच त्यांना पुन्हा लिलावती रूग्णालयात दाखल केले गेले होते मात्र दोनच दिवसांपूर्वी त्यांना घरी सोडण्यात आले होते. मृत्युसमयी त्यांची पत्नी अभिनेत्री डिंपल, मुलगी ट्विंकल आणि जावई अभिनेता अक्षयकुमार त्यांच्याजवळ होते. राजेश खन्ना यांना यकृताचा कॅन्सर झाला होता असेही सांगण्यात येत आहे. उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचा वांद्रा येथील कार्टर रोडवरच्या आशीर्वाद बंगल्याभोवती पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 सत्तरच्या दशकांत आणि ऐशीच्या दशकांच्या सुरवातीचा कांही काळ राजेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने अक्षरशः गाजविला होता. एकापेक्षा एक हिट चित्रपट देऊन ते याच काळात पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. १३ सुपरहिट चित्रपट देऊन त्यांनी त्याकाळात विक्रमच नोंदविला होता. १८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या.१९६५ साली आलेला चेतन आनंद यांचा आखरी खत हा त्यांचा पहिला चित्रपट. २०१० साली आलेला दोन दिलोंके खेल में हा त्यांचा अखेरचा चित्रपट. रोमँटिक हिरो म्हणून ते अधिक गाजले असले तरी त्यांनी कांही विनोदी चित्रपटांतूनही आपल्या अभिनयाचा प्रभाव दाखविला होता. त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीत तीन वेळा फिल्मफेअर पारितोषिक मिळविले.

आनंद हा त्यांचा अतिशय गाजलेला चित्रपट. कटी पतंग, आराधना, अंदाज, सफर, अमरप्रेम, बावर्ची, सच्चा झूठा, दो रास्ते, आन मिलो सजना, राज असे अनेक गाजलेले चित्रपट त्यांनी दिले. शर्मिला टागोर आणि मुमताज यांच्याबरोबर त्यांची जोडी विशेष जमली होती.

त्यांनी डिंपल हिच्याबरोबर केलेला विवाहही त्या काळात फारच चर्चेचा ठरला होता. कारण त्यावेळी डिंपल अवघी १६ वर्षांची होती तर राजेश खन्ना ३२ वर्षांचे होते. डिपलचा बॉबी हा पहिलाच चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला होता. त्यानंतर डिंपल ने विवाह करून कांही काळ चित्रपट संन्यास घेतला होता. त्यांना ट्विंकल आणि रिंकी अशा दोन मुली आहेत. चित्रपटसृष्टीत राजेश खन्ना काका या नावाने प्रसिद्ध होते.

Leave a Comment