पाकिस्तान न्यायालयाची पंतप्रधानांना डेड्लाइन

इस्लामाबाद, दि. १३ – अध्यक्ष असीफ अली झरदारी यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भात स्वित्झर्लंडमधील अधिकार्‍यांशी संपर्क करण्यासाठी पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान राजा परवेझ अशर्रफ यांना २५ जुलै ही डेटलाइन दिली आहे.

सरन्यायाधीश इफ्तिकार चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठाने अशर्रफ यांना झरदारी यांच्यावरील आरोपासंदर्भात स्वित्झर्लंडमधील अधिकार्‍यांची संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने यासाठी २५ जुलै ही मुदत दिली आहे. याआधी आदेशाचे पालन न केल्याबद्दल न्यायालयाने माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना अपात्र ठरवले होते.

स्वित्झर्लंडमधील अधिकार्‍यांशी संपर्क साधला आहे किंवा नाही, यासंदर्भात माहिती देण्याचे आदेशही न्यायालयाने अशर्रफ यांना दिले आहेत. दरम्यान पंतप्रधानांना न्यायालयाच्या कारवाई रोखण्यासाठी कायदेशीर संरक्षण देणारे विधेयक पाकिस्तान संसदेने मंजूर करुन घेतले आहे. या कायद्यावर अध्यक्ष झरदारींना स्वाक्षरी केली आहे.