भारतातील दोन यंग अॅप डेव्हलपर – वय वर्षे १४ आणि १०

चेन्नई दि.१२- चेन्नईतील १४ वर्षाचा श्रावण आणि त्याचा भाऊ संजय हे देशातील सर्वात लहान मोबाईल अॅप डेव्हलपर आहेत असे सांगितले तर खरे वाटेल ? नाही ना ? पण हे सत्य असून हे दोघे भारतातीलच नव्हे तर कदाचित जगातही सर्वात लहान वयाचे अॅप डेव्हलपर आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी तयार केलेली तीन अॅप्स आज आयपॅड व आयफोनवर वापरली जात आहेत आणि ३० देशातील १० हजाराहून अधिक जणांनी ती डाऊनलोडही करून घेतली आहेत. या दोघांनी तयार केलेले कॅच मी कॉप हे लहान मुलांच्या खेळाचे अॅप आयपॅडवर असून त्यांनी लहान मुलांना अल्फाबेट शिकविणारे तसेच कधीही कुठेही प्रार्थना करता येईल अशी अन्य दोन अॅपसही तयार केली आहेत.

या दोघांचे वडील कुमारन हे आयटी एक्स्पर्ट आहेत. त्यांनी या दोघा मुलांना अगदी लहान वयातच संगणक हातात दिला. श्रावण सांगतो आमचा गेम अॅपलने स्वीकारला याचा मला आनंद आहे. अॅपलच्या स्टोअर्समध्ये अक्षरशः लक्षावधी अॅपस उपलब्ध आहेत पण इतक्या लहान वयात आम्ही तयार केलेला गेम त्यांनी घेतला याचा आम्हाला अभिमान आहे. स्टीव्ह जॉब्ज आणि बिल गेटस हे त्यांचे आदर्श आहेत तसेच शैक्षणिक अॅपसवर मास्टरी मिळविण्याची त्यांची इच्छा आहे.

कांही कारणाने विद्यार्थ्यांची शाळा चुकली तर शाळेत काय काय शिकविले गेले हे मुलांना घरबसल्या समजावे म्हणून कलासरूम अॅक्टीव्हिटी रेकॉर्ड करून त्या क्लाऊडवर साठविण्याची आणि तुमच्या डिव्हाईसवर पाहण्याची सोय देणारे अॅप बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तर दुसरे मोबाईल नेव्हीगेशन हे अॅप दृष्टीहीन अथवा अधू दृष्टीच्या लोकांसाठी बनविण्याचा ते प्रयत्न करत आहेत. यामुळे अंधांना आपल्या आजूबाजूला काय काय आहे याच्या सूचना हा मोबाईलच देईल. श्रावण इयत्ता ८वीत तर संजय इयत्ता ६ वीत शिकत आहेत.

या दोघा भावांची या क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा मोठी आहे. जगातील वजनाने सर्वात हलका टॅब्लेट बनविण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांनी स्वतःची गो डायमेन्शन नावाची कंपनीही सुरू केली आहे. अॅपस बनविणे हा आता केवळ छंद नसून ते त्यांच्या कमाईचे साधनच बनले आहे. मात्र बिल गेटस आणि स्टीव्ह जॉब्ज प्रमाणेच आपल्या फायद्यातील १५ टक्के रक्कम चॅरिटीसाठी देण्याचाही त्यांचा मानस आहे. अर्थात ही रक्कम प्रामुख्याने लहान मुलांसाठी खर्च व्हावी अशी त्यांची इच्छा आहे.

Leave a Comment