लैला खानच्या फार्म हाऊसवर राष्ट्रवादीचा झेंडा ?

मुंबई दि. ११ – पाक  अभिनेत्री लैला खानच्या फार्म हाऊसवर एका राजकीय पक्षाचा झेंडा सापडला आहे. क्राईम ब्रांचच्या अधिकार्‍यांनी तो झेंडा ताब्यात घेतला आहे. हा झेंडा राष्ट्रवादी कॉग्रेसचा असल्याचे बोलले जात आहे. परंतु याला पोलिसांकडून दुजोरा मिळू शकला नाही. तपासात पोलिस कमालीची गोपनियता पाळत असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वीही लैलाच्या पर्सनल अल्बममध्ये अनेक बडे पोलिस अधिकारी आणि नेत्यांची छायाचित्रे सापडली होती. त्यामुळे लैलाचे पॉलिटिकल कनेक्शन असल्याचा संशय बळावला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

यादरम्यान इगतपुरीला पोहचलेल्या मुंबई क्राईम ब्रान्चच्या एका टीमने जॉली गिरडा, मेहबूब शेख उर्फ फज्जूसह आणखी एकाला आपल्या ताब्यात घेतले आहे. जॉली आणि मेहबूब यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा हे दोघे परवेजची स्कॉर्पियो गाडी जम्मूमध्ये घेऊन निघाले होते, त्यावेळी परवेजही काळ्या रंगाच्या मर्सिडीजमध्ये त्यांच्यासोबत होता. टोलनाक्यांवर परवेज स्वतःला एनसीपीचा महासचिव असल्याचे सांगत होता. आता परवेजचा शरद पवारांच्या पार्टीबरोबर काही संबंध आहे की नाही, हा तपासाचा विषय आहे.

यासंदर्भात मुंबई पोलिसांचे डेप्युटी कमिशनर पोटे यांनी सांगितले की, पोलिसांच्या हाती मिळालेली सर्व माहिती खरी आहे. पोलिसांच्या खबरीकडून मिळालेल्या माहितीनंतर सोमवारी सकाळी पोलिसांनी इगतपुरीमधून तीन तरुणांना ताब्यात घेतले. हे तीन तरुण म्हणजे जॉली, मेहबूब आणि त्यांचा एक सहकारी आहे. या तरुणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे तरुण परवेजची कार पोहचवण्यासाठी जम्मूला गेले होते. या तिघांकडून आणखीही काही माहिती मिळण्याची आशा पोलिसांना आहे.

परवेज टाकला १९ जुलैपर्यंत मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिस परवेजला कसार्‍याला घेऊन गेले आहेत. येथे लैलाचा मृतदेह पुरला असल्याची बातमी पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास करणार्‍या एका पोलिस अधिकार्‍याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर माहिती दिली की, परवेज टाकने लैला आणि तिच्या कुटुंबियांना लोखंडी रॉडने मारल्याचे जम्मू पोलिसांकडे कबूल केले आहे. लैलाच्या कुटुंबियांचा मृतदेह इगतपुरीत तर लैलाचा मृतहेद कसारामध्ये पुरला असल्याचे टाकने कबूल केले आहे. संपत्तीच्या वादातून लैलाचा खून केला असल्याचे परवेजने आपल्या जबाबात सांगितले आहे.

Leave a Comment