केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार दुसर्‍या क्रमांकावर

नवी दिल्ली दि.६ – राष्ट्रपतिपदाचे ‘यूपीए’ चे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत संकेत स्थळावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे नाव आहे. त्यामळे सरकारमध्ये पवार हे दुसर्‍या क्रमांकावर असल्याचे संकेत मिळत आहेत.

यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कृषी मंत्री पवार यांचे नाव काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री ए. के. अँटोनी, पी. चिदम्बरम आणि एस. एम. कृष्णा यांच्या नावाच्या वर आहे. वरील सर्व काँग्रेसचे नेते सुरक्षा विषयावरील मंत्रिमंडळ समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे पवार हे सरकारमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहेत का असा तर्क केला जात आहे. पवार यांचे नाव आत्तापर्यंत ‘यूपीए’ सरकारमध्ये दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या प्रणव मुखर्जी यांच्या जागी आले आहे. प्रणव मुखर्जी हे नेहमी दुसर्‍या क्रमांकाचे नेते मानले गेले आहेत. आणि पंतप्रधानांच्या अधिकृत विदेश दौर्‍याच्या कालावधीत ते दिल्लीत राहात असत.

या संदर्भात पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांशी संपर्क साधला असता त्यांनी यास विशेष महत्त्व देता सांगितले की, हे संकेत स्थळ सांभाळणार्‍यांनी यादी केलेली असते, त्याला राजकीय दृष्टिकोन नाही. काँग्रेसने या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त नकार दिला आहे.

Leave a Comment