’जिद्दी’ रविंद्रला हवाय मदतीचा हात

सिंधुदुर्ग, ७ जुलै-ही कहाणी आहे सिंधुदुर्गातल्या एका जिद्दीची, गरिबीचे चटके सोसत उत्तुंग यश मिळवणार्‍या एका विद्यार्थ्याची.
घरात अठरा विश्व दारिद्रय. दोन वेळच्या खाण्याची भ्रांत. विजेचा पत्ता नाही. तरिही सिंधुदुर्गातल्या सरमळे गावातला रवींद्र कांबळे खचला नाहीष्ठ कुटुंबासाठी कामं केली.

प्रसंगी शाळेत अनवाणी गेला. मात्र, दहावीत त्याने उत्तुंग यश मिळवले आहे. घरच्या गरीब परिस्थितीवर मात करत त्याने दहावीत ९१ टक्के मिळवलेत आणि सावंतवाडी विभागात पहिला येण्याचा मान त्याने पटकावला आहे.

देदीप्यमान यश मिळवले तरिही रवींद्रसमोरचे प्रश्न संपलेले नाही तर आत्ता कुठे त्यांची सुरुवात झाली आहे, असेच म्हणावे लागते आहे. कारण, उच्च शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या रवींद्रला इंजिनिअर व्हायचेय. मोठ्या मुलाला ८९ टक्के मिळूनही पैशाअभावी शिक्षण घेता आले नाही मात्र आता रवींद्रलाही शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण ठेवावे लागणार की काय? ही चिंता रवींद्रची आई जयश्री कांबळे यांना सतावत आहे आणि म्हणूनच सिंधुदुर्गातल्या या गुणवंताला हवाय एक मदतीचा हात.