भारतात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक

नवी दिल्ली, ७ जुलै-गेल्या काही वर्षामध्ये वेगाने विकसित होणार्‍या भारतामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली आहे. दक्षिण आशियातील प्रमुख अर्थव्यवस्था असणार्‍या भारतात २०११ मध्ये सर्वाधिक ३२ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक झाली असल्याचे एका अहवालात स्पष्ट झाले आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अहवालानुसार दक्षिण आशियातील एकूण गुंतवणुकीच्या ८० टक्क्यांपेक्षाही जास्त गुंतवणूक भारतात करण्यात आली आहे. यूएनने जाहीर केलेल्या जागतिक गुंतवणूक अहवाल २०१२ च्या माहितीनुसार, २०११ मध्ये भारतात ३२ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आली. त्याखालोखाल इराण आणि पाकिस्तानमध्ये गुंतवणूक झाली आहे.

या वर्षात दक्षिण आशियातील गुंतवणुकीमध्ये २३ टक्क्यांची वाढ झाली असून या वर्षात या क्षेत्रातील देशांमध्ये गुंतवणूकदारांनी ३९ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे २००९ आणि २०१० नंतर या क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. भारतानंतर इराण आणि पाकिस्तानात ४.२ अब्ज डॉलरची गुंतणूक झाली आहे. तर बांगलादेशातही १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

दक्षिण आशियातील देशांना गुंतवणूक वाढवण्यासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये या देशांमधील अस्थिर राजकीय परिस्थिती तसेच विविध धोरणे राबवण्यात होत असलेली चालढकल याचा गुंतवणुकीला फटका बसत आहे. विदेशी गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी या देशांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे यूएनने म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंध सुधारले आहेत. यामुळे दोन्ही देशांत गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. व्यापार वाढवण्यासाठी दोन देशांतील राजकीय संबंधांमध्ये आणखी सुधारणा झाल्यास त्याचा गुंतवणूक वाढवण्यासाठी फायदा होणार आहे. तसेच अंतर्गत अस्थिरता असली तरी अफगाणिस्तानमध्येही गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. या देशामध्ये असलेल्या विविध उद्योगांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात येत आहे.