७० आणि ८०च्या दशकात आपल्या जादूई आवाजाने जगाला वेडावून टाकणारे महान पार्श्वगायक किशोर कुमार यांच्याशी संबंधित अनेक वस्तूंचा लवकरच लिलाव होणार आहे. किशोरदांचे शेवटचे गाणे रेकॉर्ड केलेली तबकडी, त्यांच्या अनेक जुन्या सिनेमांचे पोस्टर आणि किशोरदांच्या विविध सिनेमांतील कपड्यांचा लिलाव होणार आहे.
किशोरदांनी मृत्यूच्या तीन दिवस आधी गायलेले शेवटचे गाणे रेकॉर्ड करण्यात आले होते. मात्र ते प्रदर्शित करण्यात आले नव्हते. किशोरदांचे चाहत्यांना लिलावात या दुर्मिळ गाण्याचे अधिकार विकत घेता येणार आहेत. या लिलावात दिवंगत अभिनेते शम्मी कपूर, निर्माते सुरेश जिंदल आणि सिनेसृष्टीतील अन्य गतकालीन दिग्गज कलाकारांच्या अनेक वस्तू लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली येथे २७ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान होणार्या १२व्या ओसिआन चित्रपट महोत्सवाच्या चौथ्या दिवशी (३१ जुलै) रोजी हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. अनेक यात आमिर खान आणि लगान सिनेमाच्या टीमने सह्या केलेली बॅट, सत्यजित रॉय यांच्या नायक आणि द ग्रेट गॅम्ब्लर सिनेमाचे पोस्टर तसेच देव आनंद यांचे काही ब्लॅक ऍण्ड व्हाइट फोटोही लिलावात ठेवण्यात आले आहे.