सौरउर्जा उत्पादनांची देशात दोन हजार दुकाने उघडणार

बंगलोर दि.५- देशभरातील रिटेल स्टोअर्समधून सौर उर्जेवर चालणारी उत्पादने उपलब्ध करून देण्याचे बंगलोर येथील अनु सोलर प्रा.लिमि. या सौर उत्पादनातील अग्रेसर कंपनीने ठरविले असून या उत्पादनात सौरबंब, सौर दिवे, सौर बॅटर्‍या, सौर पंखे असलेल्या टोप्या, सौर कॅलक्युलेटर, इन्व्हर्टर अशा अनेकविध उत्पादनांचा समावेश आहे.

याविषयी अधिक माहिती देताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक टी.जे. जोसेफ म्हणाले की वन स्टॉप एक्स्पिरियन्स स्टोअर्स असे या दुकानांचे नामकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही दुकाने व त्यातील सर्व ऑफिस उपकरणे सौर उर्जेवरच चालविली जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना सौर उपकरणांचा प्रत्यक्ष अनुभव मिळू शकणार आहे. फ्रँचाइजी पद्धतीने ही दुकाने सुरू करण्यात येत असून या आर्थिक वर्षअखेर किमान ५० दुकाने सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सरकार सौर उर्जा उपकरणांसाठी प्रोत्साहन देते आहे मात्र या उद्योगात खासगी रिटेलर नाहीत. पारंपारिक उर्जा मंत्रालय खासगी उद्योजकांना अशी दुकाने उघडावीत यासाठी प्रोत्साहन देते आहे मात्र अशा प्रकारची संपूर्ण देशात सध्या फतक्त ३०० दुकाने असून तीही मोठ्या शहरांतून नाहीत. वास्तविक जनतेला सौर उर्जेची उपयुक्तता आणि फायदे पटले आहेत. आता त्यांच्यापर्यंत जाण्याची गरज असून त्याच हेतूने अनु सोलर प्रयत्नशील आहे असेही जोसेफ म्हणाले. प्रत्येक दुकानासाठी २५ लाख रूपये भांडवल लागणार असून त्यातून वर्षाला सहा कोटी रूपयांची उलाढाल करता येणार आहे.या सर्व उत्पादनांना सरकारकडून सबसिडी दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.