लैला खानचा खून केल्याची तकची कबुली

मुंबई दि.५- गत वर्षी फ्रेब्रुवारी २०११ मध्ये गूढ रित्या बेपत्ता झालेल्या अभिनेत्री लैला खान हिचा तिच्या कुटुंबियांसह गोळ्या घालून मुंबईतच खून करण्यात आल्याची कबुली परवेझ तक याने जम्मूकाश्मीर पोलिसांकडे दिली आहे. तक सध्या अन्य कांही गुन्ह्यांसदर्भात जम्मू काश्मीर पोलिसांच्या ताब्यात आहे. तथे त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्याने वरील माहिती दिली असून आता मुंबई गुन्हा अन्वेषण विभागाने  तकविरोधात अपहरणाचा गुन्हाही नोंदविला असल्याचे सांगण्यात आले आहे.

परवेझ तक याचा राज्य दशशतवाद विरोधी पथक तसेच मुंबई गुन्हा अन्वषेण विभाग तपास करत आहेत. जम्मू काश्मीर पोलिसांनी तक याने लैला, तिची आई, बहीण आणि एका मित्राचा गतवर्षी फेब्रुवारीतच मुंबईत गोळ्या घालून खून करण्यात आल्याचे सांगितले असल्याचे मुंबई पोलिसांना कळविले आहे. मात्र लैला आणि अन्य कुणाचीच प्रेते पोलिसांना सापडलेली नाहीत. पुरेसा पुरावा सापडल्यावरच तकला मुंबई गुन्हा अन्वेषण विभाग ताब्यात घेणार असून नंतर त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला जाईल असे वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. या हत्याकांडात अनेकांचा सहभाग असल्याची माहिती जम्मूकाश्मीर पोलिसांनी दिली आहे.

गतवर्षी फेब्रुवारीत ही अभिनेत्री गूढरित्या बेपत्ता झाली होती. ती दुबईत पळून गेल्याचे सांगण्यात येत होते मात्र तिथे तिच्या नावाची प्रवेश नोंद विमानतळावर झालीच नसल्याचे उघड झाल्यावर तिचा शोध भारतातच घेण्यात येत होता. रेश्मा पटेल असे तिचे मूळचे नांव. तिचा दिल्ली हायकोर्ट बॉम्बस्फोटात सहभाग असावा असे पुरावे मिळाल्यानंतर तिचा शोध घेण्यात येत होता. दिल्ली हायकोर्ट स्फोटासाठी नेण्यात आलेली स्फोटके तिच्या गाडीतून नेण्यात आली होती. लैलाने शेवटचा फोन नाशिक येथून केल्याचे तिच्या मोबाईलवरून लक्षात आल्यानंतर तिच्या इगतपुरी येथील फार्म हाऊसवर मुंबई पोलिसांनी तपास घेतला होता.

बांगला देशातील दहशतवादी मुनीश शहा याच्यामुळे लैलाचा तकशी परिचय झाला होता असे समजते. राजेश खन्ना याच्याबरोबर केलेला वफा हा तिचा शेवटचा चित्रपट होता.