असे घडले असते तर….

इतिहासातल्या काही घटना आपल्या समाजाला काही वेगळेच वळण लावून जात असतात. पण त्या तशा घडल्या नसत्या तर किती बरे झाले असते आणि त्याऐवजी त्या अशा अशा घडल्या असत्या तर कसे वेगळे वळण लागले असते असे वाटायला लागते. आता सोनिया गांधी यांचे पंतप्रधानपद हा विषय उपस्थित झाला आहे. त्यांना या पदाने किती वेळा आणि कशी कशी हुलकावणी दिली आहे याचा इतिहास चर्चेला आला आहे. तो वेगवेगळ्या माध्यमातून आला आहे. पण त्यातून निष्कर्ष एकच निघत आहे की त्यांना त्यांच्या नशिबाने आजवर पंतप्रधान होता आलेले नाही आणि ज्या वेळी त्यांना अशी संधी आली तेव्हा त्यांच्या मनाचा गोंधळ उडून त्यांनी ती संधी सोडली. डॉ. अब्दुल कलाम यांनी सोनिया गांधी यांचे पंतप्रधानपद आपण अडवलेले नाही असे आपल्या एका पुस्तकात म्हटले आहे. त्यामुळे काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. त्यावेळी सोनिया गांधी यांना संधी होती; पण त्यांना  देशात मोठा विरोध होत आहे असे वातावरण तयार झाले होते. त्यांना अनेकांनी हे पद न स्वीकारण्याचा सल्ला दिला होता. शरद पवार यांचा तर त्यांना विरोध होताच आणि म्हणून त्यांचे परदेशी नागरिकत्व हा मुद्दा समोर ठेवून त्यांनी कॉंग्रेसमध्ये फूट पाडली होती.

भाजपाने तर मोठाच विषय केला होता. सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर देशात मोठाच असंतोष निर्माण होईल, असे वातावरण तयार केले होते. म्हणून सोनिया गांधी यांनी आपल्या ऐवजी मनमोहनसिंग यांना हे पद दिले. १९९८ साली त्यांनी वाजपेयींचे सरकार पाडले होते पण त्यांना पर्यायी सरकार देता आले नाही. त्यांना एक मत कमी पडले. मुलायमसिंग यांच्या हातात सात मते होती; पण त्यांनी सोनिया गांधी यांना पाठिंबा दिला नाही. याही वेळा त्यांची संधी हुकली.  तशी तर सोनिया गांधी यांना १९९१ सालीच ही संधी आली होती.

माजी  परराष्ट्रमंत्री  के. नटवरसिंग यांनी ही हकिकत दिली आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांनी  कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी सूचना पुढे आली होती. या हत्येच्या वेळी निवडणुका सुरू होत्या. आठ दहा दिवसातच सोनिया गांधी यांना पंतप्रधान होता येईल,  अशा  सूचना त्यांना करण्यात आल्या होत्या.  पण त्यांना त्या शोकाच्या काळात ती सूचना मान्य करणे प्रशस्त वाटत नव्हते. किंबहुना मुलांकडून राजकारणात न उतरण्याचाच आग्रह होत होता. ती संधी सोनिया गांधी यांनी सोडून दिली. नेहरू-गांधी घराण्याचे सल्लागार परमेश्‍वर नारायण हक्सर यांच्याशी सोनिया गांधी यांनी याबाबत सल्ला मसलत केली. काही  दिवस एखाद्या नेत्याला हे पद द्यावे आणि यथावकाश  सोनिया गांधी यांनी पुढे यावे असा विचार करण्यात आला. तेव्हाचे उपराष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांना हे पद द्यावे असे ठरले. पण शर्मा यांनी ही ऑफर नाकारली. त्यांचा हा नकार अनपेक्षित होता. पंतप्रधानपद चालून आले आहे डॉ. शर्मा ते नाकारत आहेत हे त्यांच्या कल्पनेपलीकडचे होते. शर्मा नकार देतील असे न वाटल्याने त्यांनी पर्यायाचा विचारच केला नव्हता. त्यांच्यापुढे आता प्रश्‍न उभा राहिला. पण हक्सर यांनी पटकन नरसिंह राव यांचे नाव सुचविले.  नरसिंह राव तर निवृत्त होण्याचा विचार करून हैदराबादेत घरही पाहून आले होते, पण त्यांना ऑफर येताच त्यांनी ती स्वीकारली. शर्मा यांनी होकार दिला असता तर इतिहास वेगळा घडला असता. नरसिंह राव यांचे नाव समोर येताच सोनिया गांधी यांनाही काही विचार करण्यास वेळ मिळाला नाही. यथावकाश त्यांनाही हटवून आपल्याला पंतप्रधान होता येईल या कल्पनेने त्यांनी रावांच्या नावाला दुजोरा दिला. त्यामुळे इतिहास वेगळा घडला. यथावकाश हटून सोनिया गांधींना पंतप्रधान होऊ देण्याचे तर नावच नाही पण नरसिंहराव यांनी त्यांचा राजकारणातला प्रवेशच अडवून धरला. सोनिया गांधी यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष करावे अशी सूचना घेऊन अर्जुनसिंग त्यांच्याकडे गेले तेव्हा नरसिंहरावनी कटू शब्दात त्याला नकार दिला. ही हकिकत अर्जुनसिंग यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केली आहे.       

त्यानंतर १९९६ सालपर्यंत नरसिंहराव यांनी सोनिया गांधी यांना राजकारणात येऊच दिले नाही. त्या किंवा त्यांचे पाठीराखे तशा काही हालचाली करायला लागले की नरसिंहराव बोफोर्स प्रकरणातला एखादा कागद पत्रकारांना देत असत. मग त्यावर बातम्या येत आणि सोनिया गांधी यांना एक पाऊल मागे टाकावे लागत असे.  त्या पक्षाच्या अध्यक्षा झाल्या, पण त्यांना पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली. मनमोहनसिंगही अनपेक्षितपणे पंतप्रधान झाले आहेत. नरसिंहराव यांनी सत्तेवर येताच नवी अर्थ व्यवस्था आणायचा निर्णय घेतला. पण त्यासाठी त्यांना एक अर्थतज्ञ अर्थमंत्री हवा होता. त्यांनी आधी आय. जी. पटेल यांना विचारले होते. पण पटेल यांनी नरसिंहराव यांची ऑफर नाकारली. मग त्यांनी शोध सुरू ठेवला त्यात त्यांना हे मनमोहनसिंग भेटले. त्यांना रावांनी पूर्ण पाठिंबा दिला.  म्हणून ते यशस्वी अर्थमंत्री ठरले आणि त्याचाच परिणाम होऊन ते पंतप्रधानही झाले. डॉ. शंकरदयाळ शर्मा यांनी होकार दिला असता तर नरसिंह राव पंतप्रधान झाले नसते आणि आय.जी. पटेलांनी रावांना होकार दिला असता तर मनमोहनसिंगांचे नशीब फळले नसते. ते फळले आणि सोनिया गांधी यांची मात्र गाडी तीन चार वेळा चुकली.

Leave a Comment